अमित शहांचा व्हिडीओ शेअर केल्याबाबत 'एक्स'ने पाठवली नोटीस, काँग्रेस नेत्यांचा दावा, भाषणाची क्लिप काढण्यास सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:21 IST2024-12-19T09:20:24+5:302024-12-19T09:21:13+5:30
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या राज्यसभेतील भाषणाची व्हिडीओ क्लिप शेअर केल्याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सने काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे.

अमित शहांचा व्हिडीओ शेअर केल्याबाबत 'एक्स'ने पाठवली नोटीस, काँग्रेस नेत्यांचा दावा, भाषणाची क्लिप काढण्यास सांगितली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करणारे काँग्रेस नेते अडचणीत सापडले आहेत. काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या काही नेत्यांना बुधवारी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सरून केंद्रीय मंत्री अमित शाह यांची व्हिडीओ क्लिप शेअर केल्याबद्दल नोटिसा मिळाल्या आहेत.
नोटीसमध्ये त्यांनी शेअर केलेला कंटेंट काढून टाकण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे भारतीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे त्यात म्हटले आहे. पाठवलेल्या नोटीसवर एक्स किंवा MHA च्या सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सने काँग्रेसला दिलेल्या नोटीसमध्ये असेही नमूद केले आहे की, व्यासपीठाद्वारे वापरकर्त्यांच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
काही काँग्रेस खासदार आणि नेत्यांनी मंगळवारी राज्यसभेत संविधानाच्या ७५ गौरवशाली वर्षांच्या प्रवासावरील चर्चेला शाह यांच्या उत्तराची व्हिडीओ क्लिप शेअर केली होती, यामध्ये ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलले आणि त्यावर विरोधकांवर हल्ला केला. काँग्रेस नेत्यांनी शहा यांच्या भाषणातील काही विशिष्ट उतारे शेअर केले. काँग्रेस नेते वस्तुस्थितीचा विपर्यास करत असून त्यांनी आंबेडकरांबद्दल केलेले वक्तव्य राज्यसभेत पूर्ण दाखवले पाहिजे, असेही शहा म्हणाले.
यापूर्वी शाह यांनी काँग्रेस नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. काल सायंकाळी पत्रकार परिषदेत शाह म्हणाले की, संविधानावरील चर्चेदरम्यान भाजपच्या वक्त्यांनी काँग्रेस संविधान, आंबेडकर, आरक्षण आणि सावरकर यांच्या विरोधात असल्याचे वास्तव मांडले. काँग्रेसला प्रत्युत्तर देऊन माझ्या विधानाचे खंडन करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेत्यांना फटकारले. एक्सवर अनेक पोस्ट करत त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे दुर्भावनापूर्ण खोटे बोलून त्यांची वाईट कृत्ये लपवता येत नाहीत, असे सांगत मोदींनी शहा यांचा बचाव केला. डॉ. आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि एससी-एसटी वर्गाला अपमानित करण्यासाठी काँग्रेसने प्रत्येक घाणेरडी युक्ती वापरली असल्याचा आरोपही केला.