निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:09 IST2025-12-18T12:09:09+5:302025-12-18T12:09:42+5:30
एका रुग्णालयात मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या ७५ वर्षीय महिलेला चुकीच्या ब्लड ग्रुपचं रक्त चढवण्यात आल्याने तिची प्रकृती जास्त बिघडली.

निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
राजस्थानमधील बीकानेर येथील एका रुग्णालयात मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या ७५ वर्षीय महिलेला चुकीच्या ब्लड ग्रुपचं रक्त चढवण्यात आल्याने तिची प्रकृती जास्त बिघडली. या प्रकारानंतर तातडीने महिलेवर उपचार सुरू करण्यात आले असून रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
७५ वर्षीय भवानी देवी यांना गंभीर एनिमियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना 'ब्लड ट्रान्सफ्यूजन' दिलं जात होतं. नातेवाईकांचा आरोप आहे की, रक्ताची पहिलं युनिट रुग्णाच्या 'A' पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपनुसार योग्य होतं. मात्र त्यानंतर दुसरं युनिट म्हणून 'B' पॉझिटिव्ह रक्त देण्यात आलं, जे कोणतीही खातरजमा न करता महिलेला देण्यात आलं.
हा प्रकार तेव्हा लक्षात आला जेव्हा रुग्णाच्या एका नातेवाईकाची नजर रक्त चढवत असताना त्या रक्ताच्या पिशवीवर लिहिलेल्या ब्लड ग्रुपवर पडली. त्यांनी तत्काळ नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरांना याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने रक्त चढवणं थांबवण्यात आलं आणि रुग्णावर आपत्कालीन उपचार सुरू झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वेळीच उपचार मिळाल्याने रुग्णाची प्रकृती सुधारली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाची माहिती सरदार पटेल मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र वर्मा यांना देण्यात आली. डॉ. वर्मा यांनी तातडीने विभागप्रमुखांसह कॅन्सर विंगमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की, महिलेची प्रकृती सध्या पूर्णपणे स्थिर आहे. तिचं हिमोग्लोबिन कमी असल्याने रात्रीच्या वेळी रक्त चढवलं जात होतं.
ट्रान्सफ्यूजनच्या प्रक्रियेदरम्यान चूक झाली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आणि चूक नेमकी कुठे झाली हे शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, असं डॉ. वर्मा यांनी सांगितलं. तसेच तपासात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तपास अहवालाच्या आधारावर पुढील पावलं उचलली जातील, असं रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे.