संसदेचे हिवाळी अधिवेशन : विचारले सर्वाधिक प्रश्न; सभागृहाची प्रशंसाही मिळविलीहरीश गुप्ता - नवी दिल्लीसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभा गाजविली ती महाराष्ट्रातील महिला खासदारांनी. विशेष म्हणजे पहिल्यांदाच लोकसभेवर गेलेल्या नवख्या महिला खासदारांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. मग त्या भाजपाच्या पूनम महाजन असोत की हिना गावित असोत, त्यांच्या प्रश्नांतून तळमळ दिसून आली.तब्बल १८१ प्रश्न विचारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांमध्ये बाजी मारली. त्यांचा लोकसभेतील १० चर्चांमध्ये लक्षवेधी सहभाग राहिला. तुलनेत पूनम महाजन यांनी कमी म्हणजे ८६ प्रश्न विचारले. पण काही प्रश्नांवर केलेल्या विवेचनावर टाळ्या मिळवत सभागृह गाजवले. हिना गावित यांनी १०५ प्रश्न विचारत सक्रियता दाखविली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथमच खासदार बनलेल्या कन्या प्रीतम मुंडे या एकही प्रश्न न विचारता अलिप्त राहिल्या. पण त्यांनी सहा चर्चांमध्ये सहभाग नोंदविला. त्यांची सभागृहातील उपस्थिती ७७ टक्के म्हणजे अन्य भाजपा खासदारांच्या सरासरी ८८ टक्के उपस्थितीपेक्षा कमीच राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहातील हजेरीबाबत पक्ष खासदारांना सज्जड दम दिल्याने भाजपाच्या खासदारांची उपस्थिती उठून दिसली.शिवसेनेच्या खासदारांनीही सक्रियता दाखविली. या पक्षाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी १७९ तर काँग्रेसचे राजीव सातव यांनी १५३ प्रश्न विचारत अग्रेसर खासदारांमध्ये स्थान मिळविले. (लोकमत न्यूज नेटवर्क)भाजपाचे गोपाळ शेट्टी यांनी केवळ १० प्रश्न विचारले आणि ६ चर्चांमध्ये सहभाग नोंदविला. पण सभागृहात १०० टक्के उपस्थिती नोंदवत वेगळेपण राखले. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनीही १०० टक्के हजेरी नोंदवतानाच ३९ चर्चांमध्ये सहभाग आणि ४९ प्रश्न विचारत शेट्टींना मागे टाकले. संसदेच्या ‘रिसर्च युनिट’ने खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेत ही आकडेवारी सादर केली आहे.
लोकसभेत चमकल्या महाराष्ट्रातील महिला
By admin | Updated: January 8, 2015 00:03 IST