Uttar Pradesh Assembly Election: काँग्रेसची वेगळी वाट किती प्रभावी?; आंदाेलनात लाठ्या खाणाऱ्यांवर विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 06:22 IST2022-01-17T06:22:31+5:302022-01-17T06:22:50+5:30
काँग्रेसने जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांमध्ये काही उमेदवारांनी निश्चित लक्ष वेधून घेतले आहे.

Uttar Pradesh Assembly Election: काँग्रेसची वेगळी वाट किती प्रभावी?; आंदाेलनात लाठ्या खाणाऱ्यांवर विश्वास
- सुरेश भुसारी
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये आंदाेलनात सहभागी झालेल्या व सरकारशी दाेन हात करणाऱ्या आंदाेलकांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. या राजकीय खेळीला किती यश येईल, हे तर काळाच्या कसाेटीवर सिद्ध हाेणार आहे. निकाेप राजकारणाच्या दृष्टीने टाकलेले पाऊल निश्चितच धाडसाचे आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांमध्ये काही उमेदवारांनी निश्चित लक्ष वेधून घेतले आहे. यात आशा सिंह (उन्नाव), पूनम पांडे (शहाजहानपूर), सदफ जफर (लखनाै मध्य), रामराज गाेंड (ओबरा), उमाकांती (काल्पी) व रितू सिंह (माेहम्मदी) या उमेदवारांचा समावेश आहे.
या उमेदवारांना काेणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. निवडणूक लढण्याचा अनुभव नाही. नागरी समाजातील अत्याचार सहन करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक असते, हे महान तत्त्वचिंतक डाॅ. राममनाेहर लाेहिया यांचे विधान त्यांच्या या गृह राज्यात सिद्ध हाेईल काय?
आशा सिंह
उन्नावमध्ये तिच्या मुलीवर बलात्कार झाला व तिला ठार मारले. या विराेधात आशा सिंह यांनी याेगी सरकारच्या विराेधात आवाज उठवला हाेता.
सदफ जफर
लखनाैची ही महिला सीएएच्या विराेधातील आंदाेलनात सहभागी झाली हाेती. दाेन मुले घरात एकटीच ठेवून तिने २८ दिवस तुरुंगवास भाेगला हाेता.
रामराज गाेंड
साेनभद्र जिल्ह्यातील उंभा या गावातील या आदिवासी तरुणाने नरसंहाराच्या विराेधात आवाज उठविला. त्याचा संघर्ष पाहून काँग्रेसने साेनभद्र जिल्ह्याचे अध्यक्षही केले आहे.
रितू सिंह
मुळात समाजवादी पक्षाची कार्यकर्ती. पंचायत निवडणुकीत उमेदवारी मागे न घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिची साडी फाडण्याचा प्रयत्न केला.
पूनम पांडे : केवळ ३२ वर्षांच्या पूनम पांडे आशा वर्करची मानधन वाढवून देण्याची मागणी केली हाेती. तिच्यावर पाेलिसांनी लाठीमार करून जखमी केले हाेते.
उमाकांती : साधी गृहिणी. मुलीला शिक्षण देण्यासाठी घरच्यांचा विराेध पत्करून मजुरीचे पैसे जमा केले. तिच्या मुली आता शिक्षक आहेत.