दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 00:26 IST2025-07-22T00:26:11+5:302025-07-22T00:26:40+5:30
Gujarat News: आतापर्यंत कान, नाक आणि डोळे यांच्या समस्या एकमेकांशी निगडित असल्याचे मानले जात होते. मात्र आता गुजरातमधील सूरत येथून एक अजब घटना समोर आली आहे.

दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
आतापर्यंत कान, नाक आणि डोळे यांच्या समस्या एकमेकांशी निगडित असल्याचे मानले जात होते. मात्र आता गुजरातमधील सूरत येथून एक अजब घटना समोर आली आहे. त्यामुळे वैद्यकीय जगतामधील काही संकेत बदलण्याची शक्यता आहे. सूरतमधील जैबुन्निसा एम. हिला सुमारे २० वर्षांपासून श्रवणदोषामुळे ऐकू येत नव्हते. मागच्या दहा वर्षांत तिचा श्रवणदोष एवढा वाढला की तिला श्रवणयंत्रांचा उपयोग करूनही ऐकू येत नव्हतं. तिला ऐकू यावं यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी तिच्या मुलींनी सुरू केली होती. दरम्यान, हल्लीच एक अशी आश्चर्यकारक घटना घडली ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
त्याचं झालं असं की, जैबुन्निसा यांना अचानक ऐकू येऊ लागलं. ती ही आनंदाची बातमी उत्साहाने पती आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगत सुटली. काही दिवसांपूर्वी जैबुन्निसा यांनी दातांवर काही उपचार करून घेतले होते. या उपचारांदरम्यान, झालेल्या नसांच्या डीकंप्रेशन प्रक्रियेमुळे जैबुन्निसा हिची ऐकण्याची क्षमता परत आली असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
तसेच आता जैबुन्निसा हिची श्रवणशक्ती परत आल्याचं प्रकरण वैद्यकीय क्षेत्रासाठी अभ्यासाचा विषय ठरलं आहे. तसेच डॉक्टरांनीही तिच्यावर करण्यात येणारी शस्त्रक्रिया आता टाळण्याचा निर्णय घेतला आहे.