पतीच्या कमी पगारामुळे त्रस्त होती महिला, दिराच्या खोलीतून चोरले ४.५५ लाख रुपये, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 21:06 IST2025-08-16T20:39:33+5:302025-08-16T21:06:33+5:30
Gujarat Crime News: पतीला असलेल्या कमी पगारामुळे त्रस्त असलेल्या एका महिलेने तिच्या दिराच्या खोलीमधून ४ लाख ५५ हजार रुपये चोरल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील राजकोट येथे घडली आहे.

पतीच्या कमी पगारामुळे त्रस्त होती महिला, दिराच्या खोलीतून चोरले ४.५५ लाख रुपये, त्यानंतर...
पतीला असलेल्या कमी पगारामुळे त्रस्त असलेल्या एका महिलेने तिच्या दिराच्या खोलीमधून ४ लाख ५५ हजार रुपये चोरल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील राजकोट येथे घडली आहे. आपल्या घरातच चोरी केल्यानंतर या महिलेने आपल्यावर कुणाला संशय येऊ नये म्हणून घरात घुसलेल्या चोरट्यांनी चोरी केल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी तपास करत काही तासांतच या महिलेचा बनाव उघडकीस आणून तिला अटक केली.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार एका महिलेला ओलीस ठेवून घरात चोरी करण्यात आल्याचा फोन गांधीग्राम पोलिसांना आला. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सदर महिलेने सांगितले की, चेहरा लपवलेले तीन चोर घरात घुसले. त्यातील एकाने माझा हात पकडला आणि गळ्यावर चाकू ठेवून धमकी दिली. त्यानंतर दिराच्या खोलीमधून ४ लाख ५५ हजार रुपये रोख आणि दागिने चोरले. घरामधून एकूण ५ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला, असा दावा या महिलेने केला होता.
मात्र पोलिसांनी कसून तपास केला असता घरामध्ये बाहेरून कुठलीही व्यक्ती आल्याचा पुरावा सापडला नाही. तसेच महिलेने दिलेला जबाबही संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. त्यानंतर या महिलेने तिचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर तिच्याकडून चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
माझ्या पतीला पगार कमी असल्याने घरखर्च चालवण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे मी दिराच्या खोलीतून पैसे चोरले आणि दागिने लपवले, अशी कबुली या महिलेने दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली. महिलेने केलेल्या या कृत्यामुळे तिच्या कुटुंबासह परिसरात राहणाऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही धक्का बसला आहे.