खल्लारी मातेच्या दर्शनासाठी गेलेले भाविक; रोपवे तुटल्याने एका महिलेचा मृत्यू, अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 14:01 IST2026-03-22T14:01:05+5:302026-03-22T14:01:35+5:30
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश!

खल्लारी मातेच्या दर्शनासाठी गेलेले भाविक; रोपवे तुटल्याने एका महिलेचा मृत्यू, अनेक जखमी
महासमुंद: छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात असलेल्या खल्लारी माता मंदिराजवळ रोपवे तुटून झालेल्या भीषण अपघातात एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी झाले आहेत. नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसोबत ही घटना घडली. अपघातानंतर तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रोपवे ट्रॉलीत 8 भाविक
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. खल्लारी गावातील डोंगरावरील खल्लारी माता मंदिरावरून खाली उतरत असताना रोपवे ट्रॉलीची तार अचानक तुटली. त्या वेळी ट्रॉलीमध्ये एकूण 8 भाविक प्रवास करत होते. तार तुटल्याने ट्रॉली खाली कोसळून अपघात झाला.
एका महिलेचा मृत्यू, सात जखमी
या दुर्घटनेत रायपूर येथील 28 वर्षीय आयुषी सातकार या महिला भाविकाचा मृत्यू झाला. तर इतर सात जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असून प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली आहे.
महासमुंद जिले के खल्लारी माता मंदिर में हुई रोप-वे दुर्घटना की सूचना अत्यंत दुःखद एवं पीड़ादायक है।
— Vishnu Deo Sai (@vishnudsai) March 22, 2026
दुर्घटना में एक श्रद्धालु के निधन के समाचार से मन व्यथित है। मेरी गहरी संवेदनाएं शोकाकुल परिजनों के साथ हैं। ईश्वर से प्रार्थना है कि दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें…
मुख्यमंत्री विष्णु देव साय यांची प्रतिक्रिया
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून मृत भाविकाच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या, तसेच जखमींना उत्तम उपचार देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.