गुरुपर्वासाठी पाकिस्तानात गेलेल्या शीख महिलेने केला निकाह; निकाहनाम्यामुळे यंत्रणा हादरल्या, एकटीला परवानगी कशी मिळाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:31 IST2025-11-15T15:18:14+5:302025-11-15T15:31:52+5:30
Sikh Woman Sarabjit Kaur: पाकिस्तानात गेलेल्या भारतीय शीख यात्रेकरुंमधील सरबजीत कौर ही महिला बेपत्ता झाल्याचे प्रकरण आता स्पष्ट झाले आहे.

गुरुपर्वासाठी पाकिस्तानात गेलेल्या शीख महिलेने केला निकाह; निकाहनाम्यामुळे यंत्रणा हादरल्या, एकटीला परवानगी कशी मिळाली?
Sarabjit Kaur: श्री गुरु नानक देवजी यांच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने पाकिस्तानला गेलेल्या १९३२ भाविकांच्या जथ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कपूरथला जिल्ह्यातील अमानीपूर येथील ५२ वर्षीय सरबजीत कौर ही महिला जथ्यातून परतताना बेपत्ता झाली आहे. जत्था १० दिवसांनी भारतात परतल्यानंतर सरबजीत कौरचा शोध सुरू झाला असता या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
भारतीय तपास यंत्रणांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत, सरबजीत कौर केवळ बेपत्ता झाली नसून, तिने संपूर्ण योजना आखून पाकिस्तानात थांबण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा झाला आहे. तिने इस्लाम धर्म स्वीकारून आपले नाव 'नूर हुसैन' ठेवले असून, शेखुपुरा येथील नासिर हुसैन नावाच्या पाकिस्तानी तरुणाशी निकाह केला आहे. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या हाती सरबजीत कौरचा निकाहनामा लागला आहे, ज्यामुळे ती याच उद्देशाने पाकिस्तानला गेली होती, हे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी सोशल मीडियावर एक उर्दू निकाहनामा व्हायरल होत आहे, ज्यात हा निकाह शेखुपुरा येथील मशिदीत झाल्याचा दावा आहे.
पाकिस्तानमध्ये प्रवेश करताना इमिग्रेशन फॉर्ममध्ये सरबजीत कौरने राष्ट्रीयत्व आणि पासपोर्ट क्रमांक सारखे महत्त्वाचे रकाने जाणूनबुजून रिकामे सोडले होते. हा नियमभंग गंभीर मानला जात आहे. पासपोर्टवर तिचे मूळ निवासस्थान कपूरथला नसून, मुक्तसर जिल्ह्यातील मलौत येथील असल्याचे नमूद आहे. ती मागील अनेक वर्षांपासून पतीच्या घरी अमानीपूर येथे राहत असतानाही, पासपोर्टवर वडिलांचे नाव देण्यात आले होते.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
या प्रकरणाला आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे, ती म्हणजे सरबजीत कौरची गुन्हेगारी पार्श्वभूमी. कपूरथला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरबजीत कौरवर यापूर्वी फसवणुकी संबंधित तीन गुन्हे दाखल होते, जे आता मिटवण्यात आले आहेत. तिच्या लवजोत सिंह आणि नवजोत सिंह या दोन मुलांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १० गुन्हे दाखल आहेत आणि ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. सरबजीत कौरचे पती करनैल सिंह जवळपास ३० वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहतात आणि तिचा त्यांच्यासोबत घटस्फोट झाला आहे. पाकिस्तानला जाण्यापूर्वी ती आपल्या पतीच्या अमानीपूर येथील घरी राहत होती.
एकटे जाण्याची परवानगी मिळाली कशी?
२०१८ मध्ये होशियारपूर येथील किरण बाला नावाच्या महिलेनेही जथ्यात जाऊन पाकिस्तानात धर्म बदलून निकाह केला होता. त्यानंतर, अशा विवादास्पद प्रकरणांना प्रतिबंध घालण्यासाठी एकाच कुटुंबातील सदस्याला सोबत घेऊन जाण्याची अट घालण्यात आली होती. असे असतानाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि एकटी गेलेल्या सरबजीत कौरला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी मिळाली कशी, हा मोठा प्रश्न आहे. या जत्थ्यासाठी केंद्र सरकार तपासणी करून व्हिसा जारी करते. त्यामुळे नवी दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्तालय आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या भूमिकेवरही आता संशय बळावला आहे.
दरम्यान, भारतीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पाकिस्तानकडून अधिकृत माहिती मागितली आहे. सरबजीत कौरने खरंच धर्म परिवर्तन केले आहे की, हे प्रकरण एखाद्या मोठ्या नेटवर्कचा भाग आहे, याचा कसून तपास सुरू आहे.