चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 03:25 IST2025-05-12T03:24:17+5:302025-05-12T03:25:09+5:30

चॅटजीपीटीने कॉफीच्या कपात तळाला उरलेल्या तलमठीचे विश्लेषण करून एक धक्कादायक भविष्यवाणी सांगितली अन् थेट घटस्फोटाचा निर्णय झाला. सुखाचा संंसार मोडला. नेमके काय झाले?

woman files for divorce in greece after chatgpt predicted husband alleged affair through coffee cup reading | चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं

चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कॉफीवर बरेच काही घडू शकते असे म्हणतात. पण लग्न मोडू शकते, हे कोणाला ठाऊक होते? ग्रीसमधील एका महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला, कारण चॅटजीपीटीने तिच्या कॉफीच्या कपात तळाला उरलेल्या तलमठीचे विश्लेषण करून एक धक्कादायक भविष्यवाणी सांगितली.

तॅसिओग्राफी या प्राचीन कलेत लोक चहा किंवा कॉफीच्या उरलेल्या तलमठीतून भविष्य वाचतात. जणू काही कॅफिनयुक्त क्रिस्टल बॉल ! त्या महिलेने कॉफी संपल्यावर उरलेल्या तलमठीचा फोटो काढून चॅटजीपीटीला विचारले, ‘काही खोल विश्लेषण करून सांग..’ एआयने काही लपवले नाही. त्याने सांगितले की, तिचा नवरा दुसऱ्या एका महिलेबद्दल स्वप्नरंजन करतोय. तिचे नाव ‘ई’ या अक्षराने सुरू होते आणि ही ‘ई’ त्यांचे घर उद्ध्वस्त करण्याच्या मागे आहे. आणि बस्स. कॉफीचे एक छोटेसे विश्लेषण कारण ठरले. ना वादविवाद, ना आदळ आपट, ना भांडण. फक्त एक वाक्य : ‘मला घटस्फोट हवा आहे.’

नवरा, अजूनही काय झालंय हे समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे. एका ग्रीक टॉक शो मध्ये नवरा म्हणाला, ‘मला वाटले ती गंमत करत होती. 

पण तसं नव्हतं. तिच्यासाठी ते खरंच होतं.’ 

नवऱ्याला घराबाहेर काढले. मुलांना घटस्फोटाचे सांगितले गेले आणि मग फोन आला तिच्या वकिलाकडून. नवरा सांगतो की एआयने सगळं खोटं बनवलंय. तो आता न्यायालयात लढतोय, सांगतोय की एआयने केलेली भविष्यवाणी ग्रीक कायद्यानुसार ग्राह्य पुरावा नाही. पण बायको? अगदी ठाम. निर्णय झाला. कप रिकामा.

तॅसिओग्राफी म्हणजे? 

ही एक प्राचीन कला आहे. यात चहा किंवा कॉफीच्या तलमठीमधून भविष्य सांगितलं जातं. चीनमध्ये याची सुरुवात झाली आणि मग ही प्रथा युरोप, आशिया, मध्यपूर्व, आणि ग्रीसपर्यंत पोहोचली. पुढच्या वेळेस तुम्ही चहा किंवा कॉफी प्याल तर सावध राहा. तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं !

 

Web Title: woman files for divorce in greece after chatgpt predicted husband alleged affair through coffee cup reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.