कफ सिरप प्यायल्याने महिलेचा मृत्यू, औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 21:51 IST2025-10-22T21:51:11+5:302025-10-22T21:51:35+5:30
काही दिवसांपूर्वीच विषारी कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कफ सिरप प्यायल्याने महिलेचा मृत्यू, औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले
कोटा (राजस्थान) - कोटा शहरात कफ सिरप प्यायल्यानंतर एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिलेची ओळख कमला देवी (वय 55) अशी असून, त्या अजय आहूजा नगर, अनंतपुरा थाना क्षेत्रातील रहिवासी होत्या. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला असून, कफ सिरपचा नमुना तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कमला देवी यांना काही दिवसांपासून खोकला आणि सर्दीचा त्रास होता. दिवाळीच्या साफसफाईदरम्यान तब्येत बिघडल्याने त्यांच्या मुलाने रंगबाडी भागातील नागर मेडिकल स्टोअरमधून कफ सिरप आणले. सिरपचे दोन झाकण घेतल्यानंतर कमला देवी यांची तब्येत अचानक बिघडली.
कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, कोटा येथे दाखल केले. डॉक्टरांनी ECG आणि काही प्राथमिक तपासण्या केल्या. डॉक्टरांच्या मते, कमला देवी यांची हृदय गती अत्यंत मंद होती. उपचार सुरू करण्यात आले, मात्र रात्री उशिरा त्यांनी उपचारादरम्यान प्राण सोडले.
घटनेची माहिती मिळताच अनंतपुरा पोलिस ठाण्याचे अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. एसआय रोहित कुमार यांनी सांगितले की, “शवविच्छेदन पूर्ण झाले असून मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केला आहे. कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात आले आहेत. कफ सिरपचा नमुना सुरक्षित ठेवून रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.”
प्राथमिक चौकशीत असे दिसते की, औषध घेतल्यानंतरच तब्येतीत बिघाड झाला, परंतु मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम आणि रासायनिक अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. पोलिस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. दरम्यान, ही घटना औषधांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करते.