केंद्र सरकारने खडसावल्यानंतर यूट्युबने हटवले विंग कमांडर अभिनंदन यांचे व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 12:00 IST2019-03-01T11:59:41+5:302019-03-01T12:00:54+5:30
पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते.

केंद्र सरकारने खडसावल्यानंतर यूट्युबने हटवले विंग कमांडर अभिनंदन यांचे व्हिडीओ
नवी दिल्ली - पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर त्यांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ काढून ते यूट्युबसह अन्य सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन यांचे हे व्हिडीओ यूट्युबवरून हटवण्यात यावेत, अशी सूचना आयटी मंत्रालयाने केली होती. त्यानंतर युट्युबकडून हे व्हिडिओ हटवण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने गुगलला पत्र पाठवून आयटी अॅक्ट 2000 मधील कलम 69 अंतर्गत विंग कमांडर अभिनंदन यांचे आपत्तीजनक व्हिडीओ हटवण्याची सूचना केली होती. बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर त्यांना मारहाण झाली होती. तसेच अभिनंदन यांचे व्हिडीओ पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. हे व्हिडीओ व्हायरल झाले होते.
विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताकडून आक्रमक पावले उचलण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठीचे पाऊल म्हणून अभिनंदन यांची सुटका करण्याची घोषणा केली होती.