Ghulam Nabi Azad: भाजपात जाणार की नवा पक्ष काढणार? काँग्रेस सोडताच गुलाम नबी आझादांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 14:40 IST2022-08-26T14:39:54+5:302022-08-26T14:40:27+5:30
Ghulam Nabi Azad: काँग्रेस सोडल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील दिग्गज नेते असलेल्या गुलाम नबी आझाद यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल याबातत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीविषयी मोठी घोषणा केली आहे.

Ghulam Nabi Azad: भाजपात जाणार की नवा पक्ष काढणार? काँग्रेस सोडताच गुलाम नबी आझादांची मोठी घोषणा
नवी दिल्ली - देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने दिल्लीतील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस सोडल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील दिग्गज नेते असलेल्या गुलाम नबी आझाद यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल याबातत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीविषयी मोठी घोषणा केली आहे.
आपल्या पुढील वाटचालीबाबत माहिती देताना गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, आता मी जम्मू-काश्मीरमध्ये परतणार आहे. तसेच तिथे मी माझ्या नव्या पक्षाची स्थापना करणार आहे. मात्र भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट शब्दात फेटाळले आहे. माझे विरोधत गेल्या तीन वर्षांपासून मी भाजपामध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठवत आहेत. तसेच त्यांनी मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीही बनवून टाकले होते, अशी टिप्पणी आझाद यांनी केली.
दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं पत्र लिहून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तसेच काँग्रेस आणि राहुल गांधींवर घणाघाती टीका करत काही गंभीर आरोप केले. काँग्रेसने इच्छाशक्ती आणि क्षमता दोन्हीही गमावले आहेत. भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी काँग्रेस नेतृत्वाने देशभरात काँग्रेस जोडो अभियान सुरू केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
तसेच आझाद यांनी राहुल गांधींवरही टीका करत आरोपांची फैर झाडली होती. ते म्हणाले की, जेव्हापासून राहुल गांधींचा राजकारणात प्रवेश झाला आहे आणि २०१३ मध्ये त्यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, तेव्हापासून त्यांनी काँग्रेसमध्ये आधीपासून असलेल्या जुन्या सल्लागार तंत्राला नष्ट केले. तसेच सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांना बाजूला केले. सध्या राहुल गांधी हे अननुभवी लोकांच्या कोंडाळ्यात घेरले गेलेले आहेत. काँग्रेसमध्ये सोनिया गांधी केवळ नाममात्र आहेत. सर्व महत्त्वपूर्ण निर्णय राहुल गांधींकडूनच घेतले जात होते. यापेक्षा वाईत शब्दांत सांगायचं तर त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि खासगी सचिव निर्णय घेत होते.