'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 22:42 IST2023-11-23T22:39:03+5:302023-11-23T22:42:44+5:30
ममता गलिच्छ राजकारण करत असल्याचे भाजपने म्हटले आहे...

'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला
विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर, आता याच मुद्द्यावरून राजकारण सुरू झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी अंतिम सामन्याच्या ठिकाणावर प्रश्न उपस्थित करत, हा सामना कोलकाता अथवा मुंबईत झाला असता, तर भारत जिंकला असता, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर, भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. ममता गलिच्छ राजकारण करत असल्याचे भाजपने म्हटले आहे.
ही निवडणूक नाही, खेळ आहे -
यासंदर्भात बोलताना भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले, - "ममता बॅनर्जी घाणेरडे राजकारण करत आहेत, याचे मला वाईट वाटते. आमच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत 11 पैकी 10 सामने जिंकले. ही निवडणूक नाही, खेळ आहे. आता पक्ष आणि राज्यांच्या नावावर विभाजन केले जात आहे. गुजरातमध्ये सामना खेळवला गेला, म्हणून तेथील लोक वाईट आहेत, अशी ममता बॅनर्जींची मानसिकता आहे. भगव्या रंगाचे कपडे परिधान केले म्हणून आपला पराभव झाल्याचे ममता म्हणत आहेत. भगवा रंग तर आपल्या ध्वजातही आहे, आता काय भारताच्या ध्वजातूनही रंग काढणार का?"
भाजप सरचिटणीस तथा आमदार अग्निमित्रा पॉल यांनीही ममतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "ममता बॅनर्जी आणि राहुल गांधींसारख्या नेत्यांकडूनच अशा गलिच्छ राजकारणाची अपेक्षा केली जाऊ शकते. या नेत्यांनी भारतीय संघाच्या प्रयत्नांचा अवमान केला आहे. भारतीय संघाने सलग 10 सामने जिंकले. त्यांच्या प्रयत्नांचे काय? त्याही त्याच काँग्रेसचा भाग होत्या, हे ममता विसरत आहेत."