गेल्या महिन्यात झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाब मोठी माहिती समोर येत आहे. ज्या ब्लॅक बॉक्सवर या अपघाताच्या कारणांची सारी मदार आहे, त्याच ब्लॅक बॉक्सने दगा दिला आहे. विमान अपघाताच्या वेळीच या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंग बंद झाले होते, असे आता समोर येत आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टीगेशन ब्युरो (AAIB) च्या प्राथमिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
विमानाचा वीजपुरवठा जरी बंद झाला तरी किंवा विमान अपघात झाला तरी त्यानंतर १० मिनिटांपर्यंत प्रत्येक गोष्ट, तांत्रिक समस्या आदी गोष्टी या ब्लॅक बॉक्समध्ये नोंद होतात. परंतू, अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानातील ब्लॅकबॉक्सने अपघातावेळीच रेकॉर्डिंग बंद केले होते. पायलटने विमानतळावर मेडे कॉल हा भारतीय वेळेनुसार 13:39:05 वाजता केला होता. तर विमान 13:39:11 वाजता कोसळले होते. यावेळी या विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद झाला होता.
विमान कोसळल्यानंतर पुढील १० मिनिटे ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंग व्हायला हवी होती. परंतू, विमान अपघातावेळीच ब्लॅक बॉक्सला पुढील काही मिनिटे वीजपुरवठा करणारी रिप्स बंद पडली होती. यामुळे ब्लॅक बॉक्सला आपत्कालीन रेकॉर्डिंग करताच आली नाही. बोईंग-७८७ सारख्या विमानांमध्ये पुढच्या बाजूला असलेल्या एन्हांस्ड एअरबोर्ड फ्लाइट रेकॉर्डरमध्ये RIPs सिस्टीम बसवण्यात आल्या आहेत. परंतू, अपघातामुळे रेकॉर्डरला होणारा वीजपुरवठा खंडित झाला.
या ब्लॅक ब़ॉक्समध्ये इंजिन पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हापर्यंतचीच नोंद आहे. रिप्स कसे निकामी झाले? समस्या कुठे आली याबाबत काहीच माहिती नाही. यावरून रेकॉर्डर फक्त विमानाच्या विजेवर चालू होता, असे समोर येत आहे. हा दोष तांत्रिक नाही तर नियामक उल्लंघन देखील असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. याबाबतची बातमी दैनिक भास्करने केली आहे.