नितीश कुमार एनडीएमध्ये परतणार? इंडिया आघाडीत अपेक्षाभंगाची भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 05:41 IST2023-12-28T05:40:59+5:302023-12-28T05:41:44+5:30
या मुद्यावर चर्चा करण्यासाठी भाजप नेतृत्त्वाने बिहारमधील भाजप नेत्यांना दिल्लीत पाचारण केले आहे.

नितीश कुमार एनडीएमध्ये परतणार? इंडिया आघाडीत अपेक्षाभंगाची भावना
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीच्या उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नानंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार किंवा किमान आघाडीचे संयोजकपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, यापैकी काहीही न मिळाल्याने ते पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलून भाजपच्या नेतृत्त्वात एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी भाजप नेतृत्त्वाने बिहारमधील भाजप नेत्यांना दिल्लीत पाचारण केले आहे.
आता भूमिका काय?
नितीश कुमार यांनी कधी भाजप, तर कधी राष्ट्रीय जनता दलासोबत जाऊन राजकीय भूमिका अनेकदा बदलली आहे. भाजपची साथ सोडून राजदबरोबर गेल्यानंतर नितीशकुमार यांनी म्हटले होते की, आता मेलो तरी बेहत्तर! परंतु भाजपबरोबर जाणार नाही.
ललन सिंह यांच्या भूमिकेने नाराजी
लालूप्रसाद यादव हे त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना नितीश कुमार यांच्या जागी लवकरात लवकर मुख्यमंत्री करण्याच्या योजनेवर काम करीत आहेत. नितीश कुमार यांच्या जवळच्या नेत्यांचीही त्यासाठी लालू मदत घेत आहेत. यात जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचे नाव समोर आले आहे. अलीकडील राजकीय घडामोडींमुळे नितीशकुमार व ललन सिंह यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने ललन सिंह यांनी राजीनामा दिला.