पटना - बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. त्यातच एनडीएत जागावाटपासोबतच मुख्यमंत्रिपदावरून पेच निर्माण झाला आहे. जर एनडीएने बिहारमध्ये विजय मिळवला तर मुख्यमंत्री कोण असणारा असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्याच प्रश्नाचं उत्तर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दिले आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडून आलेले आमदार करतील असं शाह यांनी म्हटलं आहे. एनडीए नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत आहे. नितीश कुमार यांच्यावर ना केवळ भाजपाचा तर बिहारच्या जनतेचाही विश्वास आहे असं अमित शाह यांनी सांगितले.
बिहारमध्ये एनडीएचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल या प्रश्नावर अमित शाह म्हणाले की, मी कुणाला मुख्यमंत्री बनवणारा कोण आहे, इतक्या पक्षांची युती आहे. निवडणुकीनंतर जेव्हा आम्ही बसू, आमदारांचे गटनेते बसतील आणि त्यांचा नेता ठरवतील. सध्या आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत आहे आणि आमच्या निवडणुकीचं नेतृत्व नितीश कुमारच करत आहेत असं त्यांनी म्हटलं. आजतक वृत्तवाहिनीच्या पंचायत बिहार या कार्यक्रमात शाह यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी अमित शाह यांनी बिहारमधील निवडणुकीवर भाष्य केले.
त्याशिवाय जर भाजपा आमदार अधिक असले तरीही नितीश कुमार मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न शाह यांना विचारण्यात आला. त्यावर आमचे आमदार आजही जास्त आहेत, तरीही नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत अशी आठवण करून दिली. नितीश कुमार भारतीय राजकारणात प्रमुख नेते आहेत. ते कधी काँग्रेसमध्ये राहिले नाहीत. काँग्रेससोबत त्यांचा रेकॉर्ड कधी अडीच वर्षाहून अधिक राहिला नाही. कुठल्याही व्यक्तीचं मूल्यमापन करण्यासाठी त्या व्यक्तीच्या मोठ्या कारकिर्दीकडे पाहायला हवे असं सांगत अमित शाह यांनी नितीश कुमार यांचं कौतुक केले.
दरम्यान, नितीश कुमार समाजवादी नेते आहेत. जन्मापासून ते काँग्रेसविरोधी राहिलेत. जे.पी. आंदोलनात प्रमुख नेते होते. आणीबाणीच्या काळात काँग्रेसविरोधात त्यांनी संघर्ष केला आहे. मला वाटते, नितीश कुमार यांच्यावर भाजपाचा भरवसा आहेच, पण बिहारच्या जनतेचाही विश्वास नितीश कुमार यांच्यावर आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रासारखा पॅटर्न बिहारमध्येही?
महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षासोबत युती केली. त्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते. निवडणूक काळात भाजपाने मुख्यमंत्रिपदाबाबत ठोस भाष्य केले नव्हते. परंतु निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंपेक्षा जास्त जागा भाजपाने जिंकल्या. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद न देता भाजपाने हे पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवले. त्यामुळे शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले.
Web Summary : Amit Shah suggests Bihar CM decision post-election, chosen by elected MLAs. NDA, under Nitish Kumar, enjoys BJP and public trust. Shah praised Kumar's long-standing anti-Congress stance. Speculation arises about a Maharashtra-like power shift if BJP wins more seats.
Web Summary : अमित शाह ने बिहार के मुख्यमंत्री पद का फैसला चुनाव के बाद विधायकों द्वारा चुनने का संकेत दिया। नीतीश कुमार के नेतृत्व में एनडीए को भाजपा और जनता का विश्वास प्राप्त है। शाह ने कुमार के कांग्रेस विरोधी रुख की प्रशंसा की। भाजपा के अधिक सीटें जीतने पर महाराष्ट्र जैसी सत्ता परिवर्तन की अटकलें।