दरभंगा: खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरू राहणार आहे. देशातील खासगी शिक्षण संस्थांमध्येदेखील आरक्षण लागू करण्याची पक्षाची मागणी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील आरक्षणासाठी सरकारवर पक्ष दबाव वाढवणार असल्याचा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला. बिहारच्या दरभंगा येथे आंबेडकर वसतिगृहातील ‘शैक्षणिक न्याय संवाद’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गुरुवारी ते बोलत होते.
सध्याचे केंद्रातील सरकार दलित, अति मागासवर्गीय, अल्पसंख्याक व आदिवासींच्या विरोधात आहे. ठरावीक उद्योगपतींच्या हितासाठी हे सरकार व ही व्यवस्था ५ टक्के लोकसंख्येला लाभ मिळवून देण्यासाठी काम करते. सरकार, कॉर्पोरेट जगत किंवा मीडिया यापैकी कोणालाही दलित, ओबीसी व आदिवासींचे घेणेदेणे नाही, असा दावा करत गांधींनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.