काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 00:54 IST2025-11-21T00:54:04+5:302025-11-21T00:54:25+5:30
पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहणार का? असा प्रश्न केला असता, ही अनावश्यक चर्चा असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा वद पेटला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गटाचे मंत्री आणि आमदार पक्षाच्या हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार यांचे निकटवर्तीय मंत्री एन. चलुवरायसामी आणि आमदार इक्बाल हुसैन, एच. सी. बालकृष्ण, एस. आर. श्रीनिवास आणि टी. डी. राजेगौडा दिल्लीत पोहोचले असून लवकरच हायकमांडची भेट घेणार आहेत.
डी. के. शिवकुमार समर्थक आमदार टी.डी. राजेगौडा यांनी काँग्रेसचे संघटन महासचिव वेणुगोपाल यांची भेट घेतली. सिद्धारमैया यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली असून, ठरलेल्या करारानुसार शिवकुमार यांना आता मुख्यमंत्री करावे, यावर डी. के. शिवकुमार गट आग्रही आहे. दिल्लीतील पोहोचलेले हे सर्व नेते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन या करारावर चर्चा करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर, डी. के. शिवकुमार यांचे बंधू आणि बंगळूर ग्रामीणचे माजी लोकसभा खासदार डी. के. सुरेश यांनी गुरुवारी (20 नोव्हेंबर 2025) मुख्यमंत्री सिद्धारमैया त्यांचे 'अडीच वर्षांचे वचन' पाळतील, असे म्हटले आहे.
'माझी सत्ता सुरक्षित' -
दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी "माझी सत्ता आता आणि भविष्यात सुरक्षित आहे," असे म्हटले आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. चामराजनगरला भेट दिल्यास सत्ता जाते ही अंधश्रद्धा आहे. मी चामराजनगर येथे जातो. कारण मी मी अंधविश्वासावर विश्वास ठेवत नाही. मी सर्व जिल्ह्यांना समान मानतो.
पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहणार का? असा प्रश्न केला असता, ही अनावश्यक चर्चा असल्याचे ते म्हणाले. अडीच वर्षानंतर केवळ मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा झाली होती आणि त्यानंतरच मुख्यमंत्री बदलण्याचा मुद्दा पुढे आला. एकूण 34 मंत्रीपदांपैकी दोन पदे रिक्त असून, ते रिक्त मंत्रीपद फेरबदलादरम्यान भरले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.