'UNSC'च्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताचं समर्थन करणार चीन? ड्रॅगनचे सूर बदलले, पहिल्यांदाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 02:49 IST2026-02-11T02:49:20+5:302026-02-11T02:49:45+5:30
आपण सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या आकांक्षां समजू शकतो आणि त्यांचा सन्मान करतो, असे चीनने म्हटले आहे.

'UNSC'च्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताचं समर्थन करणार चीन? ड्रॅगनचे सूर बदलले, पहिल्यांदाच...
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि भारत दौऱ्यावर असलेले चीनचे कार्यकारी उप-परराष्ट्र मंत्री मा झाओक्सू यांच्यात मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत, विषेशत्वाने सीमाभागातील शांतता आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) स्थायी सदस्यत्वासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे, आपण सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या आकांक्षां समजू शकतो आणि त्यांचा सन्मान करतो, असे चीनने म्हटले आहे.
यावेळी, दोन्ही देशांनी, सीमाभागातील शांतता टिकवण्यासाठी भारत-चीन संबंध स्थिर राहणे अत्यंत आवश्यक आहे, यावर भर दिला. ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान ब्रिक्स (BRICS) शेरपा बैठकीसाठी मा झाओक्सू भारत दौऱ्यावर आहेत. या बैठकीत विक्रम मिसरी यांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात भाष्य केले. तसेच तिच्या विस्ताराबाबत आशा व्यक्त केली.
लोकांचा संपर्क वाढवण्यावर सहमती -
दोन्ही देशांनी 'एअर सर्व्हिस ॲग्रीमेंट' लवकरात लवकर अंतिम करण्यावर भर दिला. याशिवाय, व्हिसा सुविधा सुलभ करणे आणि लोकांमधील संवाद वाढवण्यासाठी व्यावहारिक पावले उचलण्यावरही सहमती झाली. आंतरराष्ट्रीय परिस्थितीतील गुंतागुंतीचे बदल लक्षात घेता, राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण सामंजस्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करावे, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
दरम्यान, गळवान संघर्षानंतर भारत आणि चीनमधील तणाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. गळवान वादामुळे बंद झालेल्या सेवा आता पुन्हा हळू-हळू सुरू होत आहेत. दरम्यान, दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेत, संवेदनशील मुद्द्यांवरील चिंता दूर करून संबंध पुढे नेण्यासंदर्भात चर्चा झाली, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी यावेळी सांगितले.