Will BJP get 'this' state of North East again? Bodoland People's Front's exit could be a blow | ईशान्येचे 'हे' राज्य भाजपला पुन्हा मिळेल की नाही? बोडोलँड पीपल्स फ्रंट बाहेर पडल्याचा बसू शकतो फटका

ईशान्येचे 'हे' राज्य भाजपला पुन्हा मिळेल की नाही? बोडोलँड पीपल्स फ्रंट बाहेर पडल्याचा बसू शकतो फटका

गुवाहाटी : आसाममध्ये पुन्हा भाजप व मित्रपक्षांना बहुमत मिळेल, असे आतापर्यंत दोन जनमत चाचण्यांच्या निष्कर्षातून दिसून आले आहे. प्रत्यक्ष भाजपलाही आपलेच सरकार येण्याची खात्री वाटत आहे. तरीही गेल्या महिन्याभरात झालेल्या काही राजकीय बदलांमुळे गाफिल राहून चालणार नाही, हेही भाजप नेते ओळखून आहेत. 

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांत विधानसभेच्या १२६ पैकी भाजपला ६० जागा, तर मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेला १४ व बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ)ला १२ जागा मिळाल्या होत्या.  बीपीएफ आता भाजपसोबत नाही. तो काँग्रेसप्रणित महाआघाडीत आहे. गेल्यावेळी काँग्रेसला २६ आणि ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटला (एआययूडीएफ) १३ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा या दोघांची आघाडी नव्हती.  आता ती झाली असून, बीपीएफही सोबत आहे. 

 नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविषयी मुस्लिमच नव्हे, तर काही प्रमाणात हिंदूंमध्येही नाराजी आहे. त्यांनाही भारतीय असल्याचे पुरावे सादर करण्यात अडचणी येत आहेत, अशा तक्रारी आहेत. याचा फटका भाजपला बसू शकेल, अशी चर्चा आहे. 

मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याविषयी नाराजी आहे. हिमांत बिस्वा सर्मा यांचे नाव पुढे करण्याचे भाजपने ठरवले होते. पण निवडणुकीआधी असे केल्यास पक्षातील गटबाजी उफाळून येईल, असे वाटल्याने भाजपने उमेदवारच जाहीर केलेला नाही. 

काँग्रेस आघाडीच्या जागांमध्ये वाढ?
गेल्यावेळी भाजपला २९.५१, गण परिषदेला ८.१४ व बीपीएफला ३.९४ याप्रकारे तिघांना मिळून ४१.४९ टक्के मते मिळाली. याउलट स्वतंत्रपणे लढूनही काँग्रेसला ३०.९६, एआययूडीएफला १३.५ अशी ४४ टक्के मते मिळाली. त्यात आता बीपीएफची भर पडल्याने काँग्रेसप्रणीत आघाडीच्या जागांत खूप वाढ होईल, असा अंदाज आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Will BJP get 'this' state of North East again? Bodoland People's Front's exit could be a blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.