'अर्थसंकल्पाचा विरोध करण्यासाठी NITI आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार'- ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 18:11 IST2024-07-26T18:10:32+5:302024-07-26T18:11:33+5:30
अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ INDIA आघाडीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी NITI आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

'अर्थसंकल्पाचा विरोध करण्यासाठी NITI आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार'- ममता बॅनर्जी
Mamata Banerjee NITI Ayog Meeting : उद्या, म्हणजेच 27 जुलै रोजी दिल्लीत NITI आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पण, बहुतांश विरोधी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. अशातच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, भेदभाव करणाऱ्या अर्थसंकल्पाचा निषेध नोंदवण्यासाठी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांचे म्हणने आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, दिल्लीला जाण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी कोलकाता विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. मला अर्थसंकल्पापूर्वी माझे लिखित भाषण पाठवण्यास सांगितले होते, ते मी पाठवले. आता मी काही काळ बैठकीत उपस्थित असेन. मला बैठकीत भाषण करण्याची संधी मिळाली, तर मी बैठकीत उपस्थित राहील, अन्यथा बैठकीतून बाहेर पडेन.
अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ INDIA आघाडीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचे जाहीर केले आहे. अर्थसंकल्प देशविरोधी आणि त्यांच्या राज्यांसोबत भेदभाव करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.