आई आणि मुलीने केली जावयाची निर्घृण हत्या; तीन महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:47 IST2025-03-25T15:43:41+5:302025-03-25T15:47:18+5:30
बंगळुरुमध्ये एका महिलेने आईच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आई आणि मुलीने केली जावयाची निर्घृण हत्या; तीन महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह
Bengaluru Crime: मेरठच्या मुस्कानने पतीची निर्घृणपणे हत्या केल्याचं प्रकरण देशभरात गाजत आहे. मुस्कानने प्रियकर साहिलसोबत मिळून पती सौरभची हत्या केली आणि त्याचा मृतदेह ड्रममध्ये भरला. त्यानंतर अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची आणखी प्रकरण समोर आली आहेत. अशातच बंगुळुरुमध्येही आईच्या मदतीने मुलीने पतीला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर मुलीने पतीची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी आणि सासूला अटक केली आहे.
बंगळुरूमध्ये ३७ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिक लोकनाथ सिंह याची हत्या आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून व्यावसायिकाची पत्नी आणि सासूने त्याची हत्या केली होती. २२ मार्च रोजी लोकनाथचा मृतदेह चिक्कबनवाडा येथील निर्जन भागात आढळून आला होता. पोलीस तपासात त्याच्या पत्नीने आईच्या मदतीने लोकनाथला संपवल्याचे समोर आलं.
लोकनाथ सिंहची पत्नी आणि सास त्याच्या हत्येसाठी बऱ्याच आधीपासून तयारी करत होते. संधी साधून त्यांनी आधी लोकनाथला जेवणातून झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर कारमध्ये निर्जनस्थळी नेऊन चाकूने त्याचा गळा चिरला. भीतीपोटी त्यांनी मृतदेह कारमध्ये टाकून पळ काढला. पोलिसांना संध्याकाळच्या सुमारास एक मृतदेह सापडल्याचा फोन आला होता. पोलिसांनी १९ वर्षीय यशस्विनी सिंह आणि ३७ वर्षीय हेमाबाई यांना अटक केली आहे. याप्रकरणी सोलादेवनहळ्ळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकनाथ दोन वर्षांपासून यशस्विनीसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनी डिसेंबरमध्ये कुनिगलमध्ये लग्न केले. मात्र, दोघांच्या वयातील फरकामुळे तिच्या घरच्यांचा या नात्याला होता. लोकनाथ आणि यशस्विनीने लग्न केल्याचे दोघांच्याही कुटुंबियांना माहिती नव्हती. लग्नानंतर लगेच लोकनाथने यशस्विनीला तिच्या आई-वडिलांच्या घरी सोडून दिलं होतं. यशस्विनीच्या कुटुंबीयांना दोन आठवड्यांपूर्वीच तिच्या लग्नाची माहिती मिळाली.
त्यानंतर यशस्विनी आणि तिच्या घरच्या मंडळींना त्याच्या विवाहबाह्य संबंधाची आणि अवैध धंद्याच्या माहिती मिळाली. त्यामुळे लोकनाथ आणि यशस्विनीमध्ये भांडणे वाढू लागली. लग्नानंतर जेव्हाही ती लोकनाथच्या शारीरिक मागण्या मान्य करण्यास नकार द्यायची तेव्हा तो तिचा छळ करायचा. लोकनाथने यशस्विनीला तिच्या आईला त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगण्यास सांगितले होते. यानंतर लोकनाथ तिला घरी सोडून गेला. मात्र लोकनाथने पुन्हा यशस्विनीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांना धमकावले. जर ती त्याच्यासोबत राहायला परत आली नाही तर तो त्यांच्याशी वाईट वागेल असे तो म्हणाला.
कशी केली हत्या?
शनिवारी सकाळी लोकनाथने यशस्विनीला फोन करून तिला भेटायला येत असल्याचे सांगितले होते. सकाळी दहाच्या सुमारास लोकनाथ त्यांच्या एसयूव्हीने घरातून निघाला. त्याने बहिणीला सांगितले की तो बाहेर जात आहे. त्यानंतर यशस्विनी आणि त्याच्या आईने जेवण तयार केलं आणि त्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. लोकनाथला यशस्विनीसोबत पार्टी करायची होती, त्यामुळे त्याने बिअरच्या काही बाटल्याही आणल्या होत्या. यशस्विनीला सोबत घेतल्यानंतर लोकनाथ तिला बीजीएस लेआउटमधील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्याने कारमध्येच बिअर प्यायली. त्यानंतर यशस्विनीने त्याला झोपेच्या गोळ्या असलेलं जेवण खाऊ घातले.
लोकनाथ बेशुद्ध होताच यशस्विनीने तिच्या आईला लोकेशन पाठवले. हेमाबाईने चाकून त्याच्या गळ्यावर दोन वार केले. त्यानंतर शुद्ध आल्याने लोकनाथ घाबरुन पळू लागला आणि आरडाओरडा करु लागला. त्यामुळे दोघीही घाबरल्या आणि त्यांनी पळ काढला. त्यांना गाडीतच मृतदेह सोडायचा होता पण तसं झालं नाही.