पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 23:33 IST2025-11-21T23:28:29+5:302025-11-21T23:33:24+5:30
नमन सियाल यांच्या निधनामुळे केवळ त्यांच्या कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण नगरोटा बगवां विधानसभा क्षेत्रात आणि वायुसेना समुदायात शोकाची लाट पसरली आहे.

पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
दुबई एअर शो २०२५ दरम्यान भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान एलसीए तेजस क्रॅश झाल्याच्या दुःखद घटनेत ज्या वैमानिकाचा मृत्यू झाला, ते हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी होते. एअर फोर्स पायलट नमन सियाल (३५) असे या वीरपुत्राचे नाव आहे, ज्यांचा हवाई कसरतीदरम्यान अल मकतूम विमानतळावर अपघात झाला.
नमन सियाल यांच्या निधनामुळे केवळ त्यांच्या कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण नगरोटा बगवां विधानसभा क्षेत्रात आणि वायुसेना समुदायात शोकाची लाट पसरली आहे.
पत्नीही वायुसेनेत पायलट
नमन यांची पत्नी अफशां यादेखील भारतीय वायुसेनेत पायलट आहेत. १६ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांना एक ७ वर्षांची मुलगी आहे. नमन यांनी अफशां यांच्याशी दुबईत लग्न केले होते आणि ते आपल्या कुटुंबासह अनेकदा तिथे राहात होते. ते मध्ये मध्ये आपल्या वडिलोपार्जित गावी पतियाळकर येथे येत असत.
सैन्यदलाचा वारसा
नमन सियाल यांचे वडील गगन कुमार हे देखील भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि नंतर ते शिक्षण विभागात मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. नमन यांना भारतीय वायुसेनेत एक कुशल आणि धाडसी वैमानिक म्हणून ओळखले जात होते.
दुबई एअर शोमध्ये डेमो फ्लाईट दरम्यान भारतीय वेळेनुसार दुपारी ३:४० वाजता हा अपघात झाला. त्यांचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी सरकारसोबत चर्चा सुरू आहे.