तेज का झाकोळले, महाआघाडीच्या पराभवामागची ४ महत्त्वाची कारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:24 IST2025-11-15T09:22:16+5:302025-11-15T09:24:15+5:30
Bihar Assembly Election 2025: राजदने ५२ तिकिटे ही यादव समाजातील उमेदवारांना दिली. यामुळे हा पक्ष जातीयवाद पाळतो, असा आरोप विरोधकांनी जनतेपर्यंत नेला. बिहारमध्ये यादव जातीची लोकसंख्या १४ टक्के आहे. ही राजदची खरी व्होटबँक आहे.

तेज का झाकोळले, महाआघाडीच्या पराभवामागची ४ महत्त्वाची कारणे
बिहारमधील महाआघाडीच्या पराभवामागची ४ महत्त्वाची कारणे
राजदवर जातीयवादाचा शिक्का घातक ठरला
राजदने ५२ तिकिटे ही यादव समाजातील उमेदवारांना दिली. यामुळे हा पक्ष जातीयवाद पाळतो, असा आरोप विरोधकांनी जनतेपर्यंत नेला. बिहारमध्ये यादव जातीची लोकसंख्या १४ टक्के आहे. ही राजदची खरी व्होटबँक आहे. या व्होटबँकेच्या भरवशावर पक्षाने १४४ जागांपैकी ५२ तिकिटे केवळ यादव समाजाला दिल्याने ‘यादव राज’ पुन्हा येणार हा भाजपचा संदेश सर्व थरापर्यंत गेला. परिणामी बिगर यादव, मागास, अतिमागास जाती राजदपासून दूर गेल्या.
मित्रपक्षांना किंमत दिली नाही, फोटोत सर्वत्र तेजस्वीच
राजदने काँग्रेस, डावे पक्ष व अन्य छोट्या पक्षांना जागावाटपात किंमत दिली नाही. आपला पक्ष राज्यातील प्रमुख पक्ष आहे, असे राजदने सतत ठसवल्याने महाआघाडीची एकूण रणनीती विस्कळीत झाली. काँग्रेसने गॅरंटी जाहीरनाम्यावर तर तेजस्वीने सरकारी नोकरभरतीवर भर दिला. याने मतदार संभ्रमित झाला. महाआघाडीच्या एकूण प्रचारात तेजस्वीची छायाचित्रेच झळकत होती. त्यात राहुल गांधी किंवा अन्य मित्र पक्षांचे नेते अभावाने आढळत होते.
राजदची आश्वासने अवास्तव , ब्लू प्रिंट आलीच नाही
तेजस्वीने प्रचारात सरकारी नोकरी, पेन्शन, महिला सबलीकरण व दारुबंदी याची आश्वासने दिली होती. पण भाजपने सरकारी नोकरी, पेन्शनसाठी पैसा कुठून आणणार, असा सवाल मतदारांपर्यंत पोहचवला. तेजस्वींकडेही याचे उत्तर नव्हते. त्यामुळे मतदारांनाही तेजस्वींची आश्वासने अवास्तव वाटू लागली. राजदची ब्लू प्रिंट ही प्रचाराच्या अखेरच्या दिवसातही आली नाही. ती हवेत विरली.
लालूंचा वारसा दाखवणे ही मोठी घोडचूक ठरली
तेजस्वी सुरुवातीपासून प्रचार भाषणात आपले वडील लालू प्रसाद यांचा वारसा सांगत होते. ही मोठी राजकीय चूक ठरली. कारण यामुळे भाजपचे नेते लालू व राबडी देवी यांच्या काळातील गुंडगिरी, खंडणी अशा घटनांची उदाहरणे जागोजागी भाषणात देण्यास मोकळे झाले. गोपालगंज येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘तेजस्वी हे लालूंनी केलेले पाप लपवत’ असल्याचा आरोप केला. त्यामुळे तेजस्वी यांचा ‘सामाजिक न्यायाचा’ अजेंडा सपशेल अपयशी ठरला.