‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 22:10 IST2025-10-18T22:09:49+5:302025-10-18T22:10:14+5:30
Akhilesh Yadav News: दिवाळीनिमित्त रामलल्लांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सव केला जाणार आहे. त्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे.

‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला
दिवाळीनिमित्त रामलल्लांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सव केला जाणार आहे. त्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. तसेच भाजपाने या वक्तव्याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. समाजवादी पक्षाचा इतिहास हा राम मंदिर आंदोलनाला विरोध करण्याचा आणि हिंदूविरोधी कृत्ये करण्याचा असल्याची टीका भाजपाने केली आहे.
आज लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेदरम्यान, अयोध्येतील दीपोत्सवामध्ये यावेळी पणत्यांऐवजी मेणबत्त्या पेटवल्या जातील. तसेच त्यांची संख्याही कमी झाली आहे, त्यावर तुम्ही काय म्हणाल, असा प्रश्न अखिलेश यादव यांना विचारण्यात आला. त्यावर अखिलेश यादव म्हणाले की, मी कुठलाही सल्ला देऊ इच्छित नाही. मात्र भगवान श्रीरामाच्या नावावर एक सल्ला देऊ इच्छितो. जगभरात नाताळादरम्यान, सर्व शहरं उजळून जातात. तसेच अनेक दिवस ही रोषणाई सुरू असते. आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आपण दिवे आणि मेणबत्त्यांवर खर्च का करायचा. आपण या गोष्टी हटवल्या पाहिजेत. आमचं सरकार आलं की, आम्ही अयोध्येत खूप चांगल्या पद्धतीने रोषणाई करू, असे अखिलेश यादव म्हणाले.
त्यावर भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राम मंदिर आंदोलनाला विरोध करणाऱ्या, अयोध्येला अनेक वर्षे अंधारात ठेवणाऱ्या आणि राम भक्तांवर गोळीबार केल्याचा अभिमान बाळगणारा पक्ष आता दीपोत्सवानिमित्त शहरात होणाऱ्या रोषणाईला विरोध करत आहे, अशी टीका पूनावाला यांनी केली.