"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:13 IST2025-12-21T15:12:17+5:302025-12-21T15:13:20+5:30
एका पित्याने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आपलं घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, नातेवाईक आणि गावकऱ्यांकडे मदत मागितली. पण दुर्दैवाने ते आपल्या मुलाला वाचवू शकले नाहीत.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आपलं घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, नातेवाईक आणि गावकऱ्यांकडे मदत मागितली. पण दुर्दैवाने ते आपल्या मुलाला वाचवू शकले नाहीत. मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांना रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी रस्त्यावर उतरून भीक मागावी लागली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणी आता मुलाचे वडील रामलाल यांनी रुग्णालय प्रशासनाचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, मुलाच्या उपचारादरम्यान त्यांनी आधीच सुमारे ३ लाख रुपये वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये रुग्णालयाला दिलं होतं. असं असूनही मुलाच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे अतिरिक्त ३ लाख १० हजार रुपयांची मागणी सुरू केली.
घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं
रामलाल सांगतात की, ते अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. मुलाच्या उपचारासाठी त्यांच्याकडे जे काही होतं, ते सर्व त्यांनी पणाला लावलं. दागिने विकले, लोकांकडून पैसे उधार घेतले आणि शेवटी घरही गहाण ठेवलं. त्यांना वाटलं होतं आपला मुलगा वाचेल. जेव्हा रामलाल रुग्णालयाच्या बिलाची पूर्ण रक्कम जमा करू शकले नाहीत, तेव्हा प्रशासनाने मुलाचा मृतदेह देण्यास नकार दिला.
वडिलांवर आली भीक मागायची वेळ
रामलाल यानंतर रस्त्यावर आले आणि लोकांसमोर हात जोडून मदत मागू लागले. भीक मागतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. रामलाल यांनी स्वतः कबूल केलं की, त्यांना रस्त्यावर भीक मागावी लागली. ते म्हणाले, "एका पित्यासाठी यापेक्षा मोठा अपमान काय असेल? पण मुलाचा मृतदेह मिळवा यासाठी मला हे करावं लागलं."
अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू
२४ वर्षांचा धर्मवीर बदायूं जिल्ह्यातील दातागंज भागातील नगरिया गावचा रहिवासी होता. १ डिसेंबर रोजी एका अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. सुरुवातीला त्याला बदायूंमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला बरेलीतील एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं. सुमारे १३ ते १४ दिवस रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे शस्त्रक्रियाही करण्यात आली, पण अखेर त्या तरुणाचा मृत्यू झाला.
रुग्णालय प्रशासनाने फेटाळले आरोप
रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्णालयाने म्हटलं आहे की, कुटुंबाचं संपूर्ण बिल माफ करण्यात आले होते आणि भीक मागण्याची कोणतीही घटना रुग्णालय परिसरात घडलेली नाही. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा असा दावा आहे की, तरुणाचे काही नातेवाईक त्याच रुग्णालयात काम करतात. उपचारादरम्यान अनेक औषधे मोफत देण्यात आली आणि मृत्यूनंतर बिल माफ केलं गेलं असंही त्यांचं म्हणणं आहे.