'इंडिगो'वर 'अशी' वेळ का आली? पायलट्सनीच सांगितलं खरं कारण; FDTL नियम मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:17 IST2025-12-08T12:16:05+5:302025-12-08T12:17:31+5:30
सलग सात दिवसांपासून देशभरातील विमानतळांवर इंडिगोच्या विमानांच्या वेळापत्रकाची घडी विस्कटली आहे.

'इंडिगो'वर 'अशी' वेळ का आली? पायलट्सनीच सांगितलं खरं कारण; FDTL नियम मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर?
सलग सात दिवसांपासून देशभरातील विमानतळांवरइंडिगोच्याविमानांच्या वेळापत्रकाची घडी विस्कटली आहे. फ्लाईट्स रद्द होणे आणि विलंबाने उडणे, यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत. मात्र, आता या इंडिगो संकटामागचे खरे कारण उघड झाले असून, खुद्द पायलट लॉबीनेच विमान कंपनीच्या व्यवस्थापनावर सनसनाटी आणि अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पायलटांच्या म्हणण्यानुसार, कंपनी हे संकट जाणीवपूर्वक निर्माण करत आहे!
मॅनेजमेंटची नियम मोड चाल; पायलट संघटनेचा गंभीर आक्षेप
पायलटांचे स्पष्ट मत आहे की, नागरी उड्डाण महासंचालनालयाने लागू केलेले 'फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन'चे नवे सुरक्षा नियम मागे घ्यावेत यासाठी इंडिगोचे व्यवस्थापन सरकारवर दबाव आणत आहे. या नवीन, अधिक सुरक्षित नियमांना लागू न करण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब आणि विमान रद्द करण्याची समस्या निर्माण केली जात आहे, असा थेट आरोप पायलट्सनी केला आहे.
एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष साग्निक बॅनर्जी यांनी तर व्यवस्थापनाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "विमानांची सुरक्षा धोक्यात आहे. एअरलाइन्स नफ्याला प्राधान्य देत आहेत आणि पायलटांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेक वर्षांपासून काळजीपूर्वक पाळले जाणारे FDTL नियम जाणूनबुजून पायदळी तुडवले जात आहेत."
केवळ १२४ पायलटांची गरज, तरीही हजारो फ्लाईट्स कोलमडल्या कशा?
पायलट्सनी व्यवस्थापनाच्या दाव्यांतील विसंगतीही उघड केली आहे. व्यवस्थापनाने पायलट्सची कमतरता हे संकटाचे कारण असल्याचे सांगितले असले तरी, पायलट्सनी ही बाब खोटी असल्याचे सिद्ध केले आहे. इंडिगो एका दिवसात सुमारे २,२०० उड्डाणे करते. नियम लागू झाल्यावर कंपनीकडे ४,५८१ पायलट उपलब्ध होते आणि केवळ १२४ अतिरिक्त पायलटांची गरज होती.
एका पायलटने स्पष्ट केले की, केवळ ६५ कॅप्टन आणि ५९ फर्स्ट ऑफिसर कमी असल्याने हजारो फ्लाईट्स रद्द होऊ शकत नाहीत. ही संख्या कंपनीच्या एकूण उड्डाणांच्या फक्त ५ ते ७ टक्के इतकीच आहे. या आकडेवारीवरून, पायलट कमतरतेमुळे नाही, तर FDTL नियम मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठीच हे संकट उभे केले गेले आहे, असा सनसनाटी दावा पायलटांनी केला आहे.
८-१० तास आधीचे कॉल अन् ते दूरवरचे पार्किंग स्पॉट
व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराची उदाहरणेही पायलट्सनी दिली आहेत. सामान्यपणे फ्लाईट क्रूला विमानाचे उड्डाण होण्याआधी ८ ते १० तास आधी बोलावले जाते. मात्र, आता तो वेळ न देता उड्डाणाच्या अगदी काही तासांत उपस्थित राहण्यास सांगितले गेले, ज्यामुळे गोंधळ वाढला. नेहमी शेजारी पार्क होणारी विमाने अचानक ६० किलोमीटर दूरच्या स्पॉटवर पार्क केली जात होती, ज्यामुळे क्रूला रिपोर्टिंगसाठी लागणारा वेळ वाढला आणि विमानांना आणखी उशीर झाला. गेले पाच दिवस इंडिगोच्या पायलट्ससाठी अत्यंत तणावाचे ठरले आहेत. आता पायलट्सनी या मनमानी कारभाराविरोधात अधिक पारदर्शक प्रणालीची मागणी केली आहे.