शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:08 IST2025-09-24T15:49:43+5:302025-09-24T16:08:38+5:30
Ladakh unrest Update: चीन आणि पाकिस्तानसोबतच्या सीमावादामुळे संवेदनशील असलेल्या लडाखमध्ये मोठं आंदोलन सुरू झालं असून, संतप्त आंदोलकांनी लेह येथे हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला आहे. या मोर्चादरम्यान, केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या कार्यालयाचीही आंदोलकांनी जाळपोळ केली आहे.

शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या
चीन आणि पाकिस्तानसोबतच्या सीमावादामुळे संवेदनशील असलेल्या लडाखमध्ये मोठं आंदोलन सुरू झालं असून, संतप्त आंदोलकांनी लेह येथे हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला आहे. या मोर्चादरम्यान, केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या कार्यालयाचीही आंदोलकांनी जाळपोळ केली आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासह घटनेतील सहाव्या परिशिष्ट्यानुसार आदिवासी राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत हे आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.
लडाखमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनामधील आंदोलकांच्या लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, लडाखला आदिवासी राज्याचा दर्जा मिळावा, सरकारी नोकरीत स्थानिकांना आरक्षण आणि लेह व कारगिल या दोन लोकसभा मतदारसंघांची निर्मिती करावी या चार प्रमुख मागण्या आहेत. लडाखमधील लोकांना नोकरीच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात. तसेच स्थानिकांना आदिवासींचा दर्जा देण्यात यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
लडाखला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्यासाठी सातत्याने आंदोलनं होत आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक करत आहेत. हिमालयाच्या कुशीत असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर उद्योगपतींची नजर आहे. केंद्रशासित प्रदेश असल्याने या साधनसंपत्तीची लूट होऊ शकते. मात्र लडाखला आदिवासी राज्याचा दर्जा देणं हा याला रोखण्याचा एकमेव उपाय आहे, असे लडाखला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आयोजित सभांमध्ये सोनम वांगचूक सांगतात. दरम्यान, लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं असून, त्यांनी तरुणांना हिंसाचार रोखण्याचं आवाहन केलं आहे.