'देशाची प्रतिमा जगात उंचावत असताना काँग्रेसची नाराजी का?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 02:35 IST2020-02-23T02:35:30+5:302020-02-23T02:35:48+5:30
देशाच्या यशाबद्दल विरोधी पक्षाने अभिमान बाळगावा -भाजप

'देशाची प्रतिमा जगात उंचावत असताना काँग्रेसची नाराजी का?'
नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीवर टीका करणाऱ्या काँग्रेसवर भाजपने जोरदार प्रतिहल्ला चढविला आहे. देशाची प्रतिमा जगभरात उंचावली जात असताना विरोधी पक्ष नाराज का आहेत, असा सवाल भाजपने केला आहे.
येथील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत पक्ष प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले की, ट्रम्प यांचा दौरा भारत-अमेरिका संबंधांत मैलाचा दगड ठरणार आहे. देशाच्या यशाबद्दल अभिमान बाळगणे काँग्रेसने शिकायला हवे. ही जगातील सर्वांत मोठ्या आणि सर्वांत जुन्या लोकशाहीची भेट आहे. ती उत्साहाने साजरी व्हायला हवी.
पात्रा यांनी म्हटले की, भारत हा वाटाघाटींच्या बाबतीत कठोर आहे, हे स्वत: ट्रम्प यांनीच अनेक वेळा म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसने भारताच्या हिताची काळजी करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कठोर मेहनतीमुळे भारताचे इतर देशांसोबतचे संबंध आणखी मजबूत झाले आहेत.