मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:19 IST2025-11-15T14:18:26+5:302025-11-15T14:19:10+5:30
इंटेलिजेंट कॉमद्वारे सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या सर्व्हेतून समोर आलंय की, ६० टक्के हायरिंग मॅनेजरने जेनरेशन Z कर्मचाऱ्यांना नोकरी दिल्यानंतर काही महिन्यातच त्यांना कामावरून काढले आहे.

मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
मिलेनियल्स (Generation Y) आणि जेनरेशन अल्फा यांच्यातील पिढीला जेनरेशन Z म्हटलं जाते, ज्यांचा जन्म १९९७ ते २०१२ या काळात झालाय त्यांचा यात समावेश आहे. Gen Z युवकांना डिजिटल नेटिव्सही बोलले जाते. कारण हे लोक इंटरनेट, सोशल मिडिया आणि अन्य विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमांसह मोठे झाले आहेत. मात्र तरीही यांचे वर्किंग करिअर सुरक्षित नसल्याचं मानलं जात आहे.
कंपन्या सध्या जेनरेशन Z यांच्यावर भरवसा दाखवत नाहीत. जवळपास नोकरी देणाऱ्या १ हजार मॅनेजरचा एक सर्व्हे करण्यात आला. त्या सर्व्हेत ६ पैकी १ हायरिंग मॅनेजर Gen Z कर्मचाऱ्याला नोकरीवर ठेवण्यास संकोच करतात. यामागे नेमकं काय कारण आहे हे जाणून घेऊया.
६० टक्के मॅनेजरने Gen Z कर्मचाऱ्यांना मुदतीपूर्वीच काढले
इंटेलिजेंट कॉमद्वारे सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या सर्व्हेतून समोर आलंय की, ६० टक्के हायरिंग मॅनेजरने जेनरेशन Z कर्मचाऱ्यांना नोकरी दिल्यानंतर काही महिन्यातच त्यांना कामावरून काढले आहे. त्यांनी यामागचे कारणही सांगितले. ज्यात मोटिवेशन कमी, खराब कम्युनिकेशन स्किल्स आणि अनप्रोफेशनल वर्तवणूक ही प्रमुख कारणे होती.
१ हजार पैकी जवळपास ५०० कंपन्यांनी सांगितले की, युवा कर्मचाऱ्यांना नव्या गोष्टी शिकण्यात अडचणी येतात तर ४६ टक्के लोकांनी व्यावसायिकतेशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधले. अलीकडेच कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेले Gen Z कर्मचारी सतत कामाचा ताण सांभाळू शकत नाहीत असं २१ टक्के कंपन्या सांगतात, तर २० टक्के लोकांनी जेनरेशन Z कायम काम करण्यास उशीर करतात असं कारण दिले आहे. ३९ टक्के लोकांनी खराब कम्युनिकेशन स्किल्स, ३८ टक्के लोकांनी जेनरेशन झेड कर्मचारी फिडबॅक देत नाहीत आणि ३४ टक्के लोकांनी समस्या सोडवल्या जात नाहीत म्हणून जेनरेशन झेड कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वीच नोकरीवरून काढल्याचे सांगितले आहे.
स्टडी रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
खराब कामगिरी करणाऱ्या जेनरेशन झेड कर्मचाऱ्यांना परफॉर्मेंस इंप्रूवमेंट प्लानमध्ये टाकावे लागले. तरीही त्यातील ६० टक्के कर्मचाऱ्यांना अखेर नोकरीवरून काढावे लागले. जेनरेशन झेड कर्मचाऱ्यांना सांभाळणे मॅनेजमेंटसमोर नवीन आव्हान नाही, परंतु जसजसं यांची संख्या वाढत जात आहे ते आणखी गंभीर समस्या उभी करू शकतात असं कंपनीने म्हटलं. ResumeBuilder.com यांनी एप्रिलमध्ये केलेल्या एका सर्व्हेनुसार ७४ टक्के लोकांनी जुन्या पिढीच्या तुलनेत नव्या पिढीसोबत काम करणे कठीण असल्याचे सांगितले. या पिढीच्या अपेक्षा जास्त आहेत परंतु वर्क कल्चरची समज खूप कमी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या नव्या पदवीधारकांना कामावर ठेवण्यास संकोच करत असल्याचं समोर आले आहे.