सहाराचे २५ हजार कोटी कोणाचे?; सेबीकडे रक्कम पडून, पैसे मागण्यासाठी कुणी येईना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:15 AM2023-11-16T10:15:02+5:302023-11-16T10:15:47+5:30

अनेक आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अनेक वर्षे ते तुरुंगातच होते.

Whose 25 thousand crores of Sahara?; After depositing the amount with SEBI, no one comes to ask for money | सहाराचे २५ हजार कोटी कोणाचे?; सेबीकडे रक्कम पडून, पैसे मागण्यासाठी कुणी येईना

सहाराचे २५ हजार कोटी कोणाचे?; सेबीकडे रक्कम पडून, पैसे मागण्यासाठी कुणी येईना

नवी दिल्ली : सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर सेबीकडे पडून असलेल्या २५ हजार कोटी रुपयांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुब्रतो रॉय यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी मुंबईत मंगळवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. अनेक आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अनेक वर्षे ते तुरुंगातच होते.

२०११ मध्ये शेअर बाजार नियामक सेबीने सहारा समूहाची कंपनी सहारा रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लि. आणि सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांना त्यांनी ३ कोटी गुंतवणूकदारांकडून बाँडच्या माध्यमातून उभे केलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर सेबीने आदेशात म्हटले होते की, कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन करून निधी उभारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०१२ रोजी सेबीचे निर्देश कायम ठेवले. कंपन्यांना जमा केलेले पैसे १५ टक्के व्याजासह परत करण्यास आदेश दिले. 

अहवाल काय सांगतो?

सेबीने सहारा समूहाच्या दोन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना ११ वर्षांत १३८.०७ कोटी रुपये परत केले. विशेषत: परतफेडीसाठी उघडलेल्या बँक खात्यांमधील ठेवी २५ हजार कोटींहून अधिक झाल्या आहेत. सहाराच्या दोन कंपन्यांच्या बहुतेक बॉण्डधारकांनी याबाबत कोणताही दावा केला नाही व गेल्या आर्थिक वर्षात रक्कम ७ लाख रुपयांनी वाढली. सेबी-सहारा परतफेड खात्यांमधील शिल्लक रक्कम १,०८७ कोटी रुपयांनी वाढली. सेबीला ३१ मार्च २०२३ पर्यंत ५३,६८७ खात्यांसाठीचे १९,६५० अर्ज प्राप्त झाले. यापैकी  ४८,३२६ खात्यांशी संबंधित १७,५२६ अर्जांच्या बदल्यात ६७ कोटी रुपयांच्या व्याजासह एकूण १३८.०७ कोटी परत करण्यात आले.

पैसे परत करा!
यानंतर सहाराला गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी सेबीकडे अंदाजे २४ हजार कोटी रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. 
मात्र, समूहाने सांगितले की, त्यांनी आधीच ९५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूकदारांना थेट पैसे दिले आहेत.

Web Title: Whose 25 thousand crores of Sahara?; After depositing the amount with SEBI, no one comes to ask for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SEBIसेबी