कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:41 IST2025-08-12T11:40:51+5:302025-08-12T11:41:30+5:30
Vice Presidential Election: भाजपाच्या एनडीएमधील मित्रपक्षांनी उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिले आहेत. त्यानुसार आज हे दोघेही एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करतील, असे सांगण्यात येत आहे.

कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
जगदीप धडखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्याने निवडणूक जाहीर झाली आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपाने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निवडण्यासाठी विचारमंथन सुरू केलं आहे. तर भाजपाच्या एनडीएमधील मित्रपक्षांनी उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिले आहेत. त्यानुसार आज हे दोघेही एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करतील, असे सांगण्यात येत आहे. तसेच यासाठी भाजपामधील काही नेत्यांच्या नावांची माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे.
प्रसारमाध्यांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार जगदीप धनखड हे जाट समाजातील होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे या समाजात नाराजी आहे. त्यामुळे धनखड यांचा उत्तराधिकारी म्हणून जाट समुदायातील नेत्यालाच प्राधान्य दिलं गेलं तर गुजरातचे राज्यपाल आचार्च देवव्रत यांना भाजपाकडून संधी दिली जाऊ शकते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. जगदीप धनखड हे राजस्थानमधील जाट समाजातील होते. तर आचार्य देवव्रत हेसुद्धा जाट समाजातील असून, ते हरयाणामधील आहेत.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतिपदासाठी आज एनडीएकडून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत झालेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना एनडीएचा उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार देण्यात आले होते. या बैठकीला एनडीएमधील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.