खरगेंनंतर नवीन विरोधी पक्षनेता कोण? चर्चांना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 08:03 IST2022-11-21T08:02:33+5:302022-11-21T08:03:14+5:30
या पदासाठी पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश आणि प्रमोद तिवारी यांच्या नावाचा विचार केला जात आहे.

खरगेंनंतर नवीन विरोधी पक्षनेता कोण? चर्चांना वेग
हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याने नवीन विरोधी पक्षनेत्याच्या चर्चांना वेग आला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. खरगे यांनी त्यावेळी काँग्रेसच्या संसदेतील अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठविला होता. खरगे यांची निवड होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी सोनिया गांधी यांनी कोणाचीही विरोधी पक्षनेते पदासाठी निवड केलेली नाही. या पदासाठी पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश आणि प्रमोद तिवारी यांच्या नावाचा विचार केला जात आहे.
एक व्यक्ती, एक पद
- कायदेशीर दिग्गज आणि राज्यसभा सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांनीही या पदासाठी स्वारस्य दाखविले आहे.
- जर त्यांना या पदासाठी निवडले गेले तर त्यांना वकिलीची प्रॅक्टिस करणे सोडावे लागेल. कारण, या पदाला कॅबिनेटचा दर्जा आहे. तथापि, सोनिया गांधी यांची कार्यशैली पाहता नवीन विरोधी पक्षनेता निवडण्याची त्या घाई करणार नाहीत.
- कर्नाटकात मार्च २०२३ मध्ये निवडणुका होणार आहेत. खरगे हे कर्नाटकचे आहेत आणि ते दुहेरी पदे भुषवू शकतात; मात्र हे अवघड आहे.
- कारण, काँग्रेसने उदयपूर जाहीरनामा स्वीकारला आहे. यात
एक व्यक्ती, एक पद हे तत्त्व अधोरेखित आहे.