मृत्यू झाल्याचे सांगितले अन् नंतर निघाला जिवंत; पाकमधल्या 'त्या' दहशतवाद्यावाद्याची भारताने करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:02 IST2025-05-07T14:47:37+5:302025-05-07T15:02:53+5:30

ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी साजिद मीर या दहशतवाद्याचा उल्लेख केला.

Who is Sajid Mir mastermind of the Mumbai attack Foreign Secretary narrated the nefarious story of him | मृत्यू झाल्याचे सांगितले अन् नंतर निघाला जिवंत; पाकमधल्या 'त्या' दहशतवाद्यावाद्याची भारताने करुन दिली आठवण

मृत्यू झाल्याचे सांगितले अन् नंतर निघाला जिवंत; पाकमधल्या 'त्या' दहशतवाद्यावाद्याची भारताने करुन दिली आठवण

Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर आता भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करुन बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर राबवून भारताच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ महत्त्वाच्या ठिकाणांवर कारवाई केली आहे. भारताकडून लक्ष्य करण्यात आलेली नऊ ठिकाणे ही जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांचे तळ होते. त्यामुळे दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे. या कारवाईनंतर साजिद मीर या दहशतवाद्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशनची माहिती दिली. यावेळी विक्रम मिस्री यांनी लष्करचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड साजिद मीर याचा उल्लेख केला. पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे कारनामे सांगताना विक्रम मिस्री यांनी साजिद मीर या दहशतवाद्याबाबत माहिती दिली.

"दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाकिस्तानने जगभर आपली ओळख निर्माण केली आहे. तिथे दहशतवादी सुरक्षित राहतात. साजिद मीरला पाकिस्तानने मृत घोषित केले होते, पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे तो जिवंत असल्याचे समोर आले," असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले.

कोण आहे साजिद मीर?
 
साजिद मीर हा ९० च्या दशकापासून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित कारवायांमध्ये सहभागी आहे. मीर हा भारतासह विविध देशांना तो मोस्ट वॉन्टेड आहे. साजिद मीर हा लष्कराच्या इंडिया सेटअपचा प्रभारी आहे. साजिद मीर हा २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक आहे. मुंबई हल्ल्यात १७५ जणांचा मृत्यू झाला होता आणि २९१ जण जखमी झाले होते. नोव्हेंबर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी मीर लष्कर-ए-तोयबाचा प्रकल्प व्यवस्थापक होता. ऑपरेशन दरम्यान तो सॅटेलाईट फोनद्वारे हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सूचना देत होता.

साजिद मीर हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने त्याच्यावर ५० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. साजिद मीर  वेश बदलण्यात हुशार आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. पूर्वी साजिद मीर लांब दाढी आणि केस ठेवत होता. पण आता अ त्याने प्लास्टिक सर्जरी करून त्याचे चेहरा बदलल्याचे म्हटलं जात आहे. साजिद मीर पाकिस्तानात लपून बसला आहे.

साजिद मीरला वाचवण्यासाठी पाकिस्तानाने प्रयत्न देखील केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव वाढल्याने पाकिस्तानचे बिंग फुटले. साजिद मीरचा मृत्यू झाल्याची अफवा पाकिस्तानाने पसरवली होती. मात्र त्यानंतर तो जीवंत असल्याचे समोर आले. पाकिस्तानने फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रेस लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे मान्य केले होते. त्या यादीत चक्क साजिद मीरचे नाव देखील होते ज्याला पाकिस्तानानेच मृत घोषित केले होते. त्यानंतर पाकिस्तानने, साजिद मीरला दहशतवादासाठी निधी पुरवल्याच्या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, असं सांगितले होते. साजिद मीरप्रमाणे पहलगाम हल्ल्यातही पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आल्याने त्यांचा चेहरा समोर आला आहे.

Web Title: Who is Sajid Mir mastermind of the Mumbai attack Foreign Secretary narrated the nefarious story of him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.