New Delhi Railway Station Stampede: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. तेथे जाण्यासाठी शनिवारी रात्रीच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे येथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली. येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाल आहे. यात २ मुलांचाही समेश आहे. याशिवाय १० लोक गंभीर जखमी असल्याचेही समजते. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ जवळील एस्केलेटरजवळ ही चेंगराचेंगरी झाली. विरोधी पक्षांनी या दुर्घटनेसाठी केंद्र सरकारच्या गैरव्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.
यासंदर्भात काँग्रेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर म्हटले आहे की, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर कुंभमेळ्यासाठी जात असलेल्या अनेक बाविकांच्या मृत्यूची बातमी वेदनादायी आहे. काँग्रेस कुटुंबाच्या संवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत. या दुःखाच्या वेळी, देव शोकाकुल कुटुंबांना शक्ती देवो आणि जखमी लवकरात लवकर बरे होवोत. मोदी सरकारने मृतांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांना सोपवून त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करावी आणि सर्व जखमी भाविकांना योग्य आणि चांगले उपचार देण्यात यावेत," असेही म्हटले आहे. याच वेळी काँग्रेसने सरकारला काही प्रश्नही केले आहेत ते असे... -- कुंभमेळा सुरू आहे, हे सरकारला माहीत होते, तर त्यांनी अधिक गाड्या का चालवल्या नाहीत. - रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था का केली गेली नाही?- या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण?
काय म्हणाले आप नेते संजय सिंह - याशिवाय, आप नेते संजय सिंह यांनीही एक्सवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "आमच्या जिवनाची काहीच किंमत नाही का? दिल्ली रेल्वे स्थानकावरील गैरव्यवस्थापनामुळे चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाला. या मृत्यूंसाठी कुणी तर जबाबदार असेल? कुंभमेळ्यात मृत्या झाला तर म्हटले जाते "मोक्ष मिळाला". आता सरकार म्हणेन “कुणी सांगितलं होतं स्टेशनवर यायला?” माणूस मरो अथवा जगो सरकारची प्रतिमा चांगली रहायला हवी."
चौकशीसाठी रेल्वेकडून द्विसदस्यीय समितीची स्थापना -यासंदर्भात बोलताना रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणाले, "आज सायंकाळच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या नेहमीपेक्षा खूप अधिक होती. यामुळे रेल्वेने नियमित गाड्यांसह विशेष गाड्या चालवल्या. काही वेळासाठी प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली, यामुळे काही लोक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या परिस्थिती सामान्य आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि आरपीएफ डीजी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.