कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:13 IST2025-11-15T16:12:42+5:302025-11-15T16:13:03+5:30
काझीगुंडचा रहिवासी असलेल्या डॉ. मुजफ्फरच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची तयारी सुरू आहे.

कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
जम्मू-काश्मीर पोलीस सीबीआयमार्फत इंटरपोलची मदत घेत आहेत. काझीगुंडचा रहिवासी असलेल्या डॉ. मुजफ्फरच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची तयारी सुरू आहे. आंतरराज्यीय 'व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचा तो महत्त्वाचा सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. डॉ. मुजफ्फर हा डॉ. आदिलचा मोठा भाऊ आहे, ज्याला दिल्लीतील लाल किल्ला कार स्फोट प्रकरणातील आठ आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
पाकिस्तान हँडलर आणि अफगाणिस्तान कनेक्शन
चौकशीतून असे समोर आले आहे की, मुजफ्फर ऑगस्टमध्ये भारत सोडून दुबईला गेला आणि आता तो अफगाणिस्तानात लपून बसल्याचा संशय आहे. मुजफ्फर हा भारतातील मॉड्यूल आणि पाकिस्तानमधील हँडलर्समध्ये लिंक म्हणून काम करत होता. हे संपूर्ण ऑपरेशन अफगाणिस्तानमधून नियंत्रित केले जात होते. तो जैशच्या 'उकाशा' नावाच्या हँडलरच्या संपर्कात होता.
तुर्की कनेक्शन
या प्रकरणात तुर्की कनेक्शनही उघड झाले आहे. २०२२मध्ये मुजफ्फर आणि डॉ. मुजम्मिल शकील यांनी तुर्कीचा प्रवास केला होता. तुर्कीमध्ये त्यांची उकाशासोबत भेट झाली. याच भेटीत फंडिंगचे मार्ग आणि हल्ल्याची योजना निश्चित करण्यात आली. यानंतर मुजफ्फर दुबईतून बसून पैशांपासून लॉजिस्टिकपर्यंत संपूर्ण नेटवर्क चालवत होता. भाऊ आदिलला अटक झाल्यानंतर तो लगेच अफगाणिस्तानला पळून गेला.
कट्टरता पसरवल्याचा आरोप
मुजफ्फरवर कुटुंबात कट्टरता पसरवल्याचा आरोप आहे. पोलिसांनुसार, आदिलला कट्टरतेकडे ढकलण्यात मुजफ्फरची मोठी भूमिका होती. त्यानेच आदिलची उमर मुजम्मिल आणि मौलवी इरफान यांच्याशी भेट घडवून आणली होती. दिल्लीतील स्फोटाचे आदेशही मुजफ्फरनेच दिले असावेत, असा एजन्सींना संशय आहे.
टेलीग्राम ग्रुप आणि मेडिकल कॉलेज लिंक
हे संपूर्ण मॉड्यूल दोन टेलीग्राम ग्रुप्समुळे प्रभावित झाले होते, ज्यातून त्यांना कट्टरपंथी सामग्री मिळत होती. तुर्कीतून परतल्यानंतर मुजम्मिल फरिदाबादच्या एका विद्यापीठात आला, तर आदिलची पोस्टिंग सहारनपूर येथे झाली. यानंतर देशभरात या गटाच्या हालचाली वाढल्या.
एजन्सींच्या माहितीनुसार, डॉ. मुजफ्फर या दहशतवादी नेटवर्कचा म्होरक्या आहे आणि त्याच्या अटकेमुळे अनेक देशांमध्ये पसरलेल्या या नेटवर्कच्या कनेक्शनचा पर्दाफाश होऊ शकतो. पोलीस इंटरपोलच्या माध्यमातून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.