कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:03 IST2025-11-10T14:01:32+5:302025-11-10T14:03:36+5:30
ही कारवाई अन्सार गजवत-उल-हिंद (AGH) या दहशतवादी संघटनेशी संबंधित तपासाचा भाग आहे. तपासात या संघटनेशी तीन डॉक्टर जोडले गेले

कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
जम्मू-काश्मीर पोलिसांनी एनसीआरमधील फरीदाबाद येथून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करत मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी ३५० किलो स्फोटक, दोन ए.के.-४७ रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. ही कारवाई काश्मिरी डॉक्टर आदिल अहमद राठर याच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. तसेच, राठरने काश्मीर खोऱ्यातील आपल्या लॉकरमध्येही ए.के.-४७ रायफल आणि काही दारुगोळा ठेवला होता. त्याने एक खोली भाड्याने घेतली होती. त्यात शस्त्रे आणि स्फोटके ठेवण्यात आली होती, असेही तपासात उघड झाले आहे. आता हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवले जाऊ शकते.
ही कारवाई अन्सार गजवत-उल-हिंद (AGH) या दहशतवादी संघटनेशी संबंधित तपासाचा भाग आहे. तपासात या संघटनेशी तीन डॉक्टर जोडले गेले असल्याचे समोर आले आहे. त्यांपैकी अनंतनागचा आदिल राठर आणि पुलवामाचा मुजम्मिल शकील या दोघांना प्रत्येकी सहारनपूर आणि फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या डॉक्टरचा शोध सुरू आहे.
खोऱ्यातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठी स्फोटक जप्ती -
गेल्या दोन दिवसांपूर्वी अनंतनाग मेडिकल कॉलेजमधील आदिल राठरच्या लॉकरमधून ए.के.-४७ रायफल सापडली होती. अटक करण्यात आलेले दोन्ही डॉक्टर सध्या जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, ही खोऱ्यातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठी स्फोटक जप्ती असून तपास अद्यापही सुरूच आहे.
कोण आहे आदिल -
आदिल राठर हा अनंतनागचा रहिवासी असून सहारनपूरच्या अंबाला रोडवरील खासगी रुग्णालयात मेडिसिन तज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. त्याने अलीकडेच सहारनपूरच्या एका महिला डॉक्टरशी निकाह केला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावल्याने तणाव निर्माण झाला होता. तरम्यान या प्रकरणात अधिकाऱ्यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर स्थानिक गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.