नवी दिल्ली- काशीत २०० वर्षात पहिल्यांदाच शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनदिनी शाखेत संपूर्ण एकल मुखस्थ दंडक्रम पारायण पूर्ण झाले. वेद पठणाच्या आठ प्रकारांपैकी सर्वात कठीण मानले जाणारे दंडक्रम पारायण या युवकाने पूर्ण केले. महाराष्ट्राच्या अहिल्यानगर येथील १९ वर्षीय युवक देवव्रत महेश रेखे यांनी केवळ ५० दिवसांत दंडक्रम पारायण पूर्ण करून नवा विक्रम केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही देवव्रत यांच्या यशाचं कौतुक केले. नमोघाटावर आयोजित काशी तामिळ संगममच्या मंचावर देवव्रतचा सन्मान करण्यात आला.
याआधी २०० वर्षापूर्वी नाशिकच्या वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी दंडक्रम पारायण पूर्ण केले होते. त्यानंतर देवव्रत रेखे यांनी हा पराक्रम केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवव्रत यांचं कौतुक करताना त्यांनी जे केले आहे ते येणाऱ्या पिढ्या कायम लक्षात ठेवतील असं म्हटलं. महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील रहिवासी वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे यांचे पुत्र असलेले देवव्रत रेखे हे फक्त १९ वर्षाचे आहेत. त्यांनी काशीच्या रामघाट येथील सांगवेद विद्यालयातून शिक्षण घेतले. २९ नोव्हेंबरला दंडक्रम पारायण पूर्ण केल्यानंतर शृंगेरी शंकराचार्य यांनी देवव्रत यांचा सन्मान करत त्यांना सोन्याचे कडे आणि १ लाख १ हजार ११६ रूपये दिले.
वाराणसीच्या रामघाट येथील वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयातील वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी कठोर अभ्यास आणि समर्पणातून हे यश मिळवले. १२ ऑक्टोबरपासून सुरू झालेले हे तप २९ नोव्हेंबरला पूर्ण झाले. दंडक्रम पारायणकर्ते अभिनंदन समितीचे पदाधिकारी चल्ला अन्नपूर्णा प्रसाद, चल्ला सुब्बाराव, अनिल किंजवडेकर, चंद्रशेखर द्रविड घनपाठी, प्रा. माधव जर्नादन रटाटे यांनी देवव्रत यांच्या यशाबद्दल सांगताना ते नित्यनियमाने साडे तीन ते ४ तास पठण करून दंडक्रम पारायण पूर्ण केल्याचे सांगितले.
१९ वर्षीय देवव्रत रेखे यांनी जे यश मिळवले आहे ते ऐकून मन उत्साहित झाले. त्यांचा हा विक्रम येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. भारतीय संस्कृतीवर आस्था ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यामुळे आनंद होईल. देवव्रत यांनी शुक्ल यजुर्वेदच्या मध्यनदिनी शाखेत २००० मंत्र असणारे दंडक्रम पारायण ५० दिवसात कुठल्याही अडथळ्याविना पूर्ण केले. त्यात अनेक वैदीक ऋचा अन् पवित्र शब्दाचा उल्लेख आहे, ज्यांना पूर्ण शुद्धतेने उच्चारणे गरजेचे असते. ही कामगिरी गुरु परंपरेत सर्वात श्रेष्ठ मानली जाते. काशीचा खासदार म्हणून मला या गोष्टीचा गर्व आहे की देवव्रत यांनी ही अद्भूत साधना या पवित्र भूमीवर केली आहे. मी त्यांचे कुटुंब, साधूसंत, विद्वान आणि देशभरातली त्या सर्व संस्थांचं अभिनंदन करतो, ज्यांनी या तपस्येत देवव्रत यांना सहकार्य केले असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Web Summary : Nineteen-year-old Devavrat Rekhe completed the Danda Kram Parayan in Kashi, a rare feat. He finished it in 50 days, earning praise from PM Modi and CM Yogi. Rekhe was honored at the Kashi Tamil Sangamam.
Web Summary : उन्नीस वर्षीय देवव्रत रेखे ने काशी में दंड क्रम परायण पूरा किया, जो एक दुर्लभ उपलब्धि है। उन्होंने इसे 50 दिनों में पूरा किया, जिसके लिए पीएम मोदी और सीएम योगी ने उनकी प्रशंसा की। रेखे को काशी तमिल संगमम में सम्मानित किया गया।