बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:09 IST2025-11-14T14:08:19+5:302025-11-14T14:09:04+5:30
Bihar election result news: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये NDA ने जोरदार आघाडी घेतली असून, या अभूतपूर्व यशामागे महिला मतदारांची निर्णायक भूमिका आहे.

बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
लालू प्रसाद यादवांच्या भावकीतील वाद आणि नितीशकुमार यांच्या महिलांसाठीच्या योजना यामुळे एनडीएने हे घवघवीत यश संपादन केल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये NDA ने जोरदार आघाडी घेतली असून, या अभूतपूर्व यशामागे महिला मतदारांची निर्णायक भूमिका आहे. यातून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दारूबंदी आणि 'जीविका दीदी' योजनांमुळे महिला मतदारांनी NDA ला एकतर्फी पाठिंबा दिल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
एकूण मतदानापैकी पुरुषांपेक्षा सुमारे १०% अधिक मतदान महिलांनी केले होते. हा आकडा महिला मतदान: ७१.६%, पुरुष मतदान: ६२.८% असा होता. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच एक्झिट पोल आणि आता मतमोजणीचे आकडे स्पष्टपणे नितीश कुमार लाडके ठरल्याचे दर्शवत होते. यंदाच्या निवडणुकीत महिलांनी विक्रमी मतदान केले. पुरुषांच्या तुलनेत जवळपास १० टक्क्यांनी अधिक मतदान करून या 'अर्ध्या लोकसंख्येने' राजकारणाचा संपूर्ण नकाशा बदलला आहे.
दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय ठरला गेमचेंजर
नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्याचा घेतलेला निर्णय महिलांसाठी सर्वात महत्त्वाचा ठरला. दारूमुळे होणारा कौटुंबिक त्रास, आर्थिक नुकसान आणि हिंसाचार थांबल्यामुळे महिलावर्गाने मोठ्या संख्येने नितीश कुमारांच्या बाजूने मतदान केले. हा निर्णय महिला मतदारांमध्ये नितीश कुमारांच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण ठरला.
'जीविका दीदी' योजनेची जादू
निवडणुकीपूर्वी नितीश सरकारने 'जीविका दीदी' योजनेअंतर्गत सुमारे १.३० कोटी महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले होते. स्वयंसहाय्यता समूहांना बळ देणाऱ्या या योजनेने थेट महिलांच्या हातात पैसा दिला. या आर्थिक पाठिंब्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये सरकारबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले, ज्याचा फायदा NDA ला झाला.
जुन्या योजनांची भक्कम साथ
२००६ मध्ये सुरू केलेली 'मुख्यमंत्री बालिका सायकल योजना' आणि शालेय गणवेश योजना यांसारख्या जुन्या योजनांनी देखील महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. या दीर्घकालीन योजनांमुळे नितीश कुमारांची प्रतिमा महिलांच्या प्रगतीसाठी काम करणारा नेता अशी कायम राहिली.