ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 06:29 IST2025-07-25T06:29:15+5:302025-07-25T06:29:28+5:30

यदु जोशी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : “हे सासर, माहेर ते, ही काशी, रामेश्वर ते” अशी ओळ असलेले लेक ...

Who are Taisaheb's in-laws and father-in-law? Voters will know on the ballot paper! | ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!

ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!

यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क


मुंबई : “हे सासर, माहेर ते, ही काशी, रामेश्वर ते” अशी ओळ असलेले लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, हे पी. सावळराम यांचे सुप्रसिद्ध गीत. माहेर सुटले की माहेरचे नावही सुटते म्हणतात... पण, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांची दोन्ही नावे ईव्हीएमवर येतील अशी व्यवस्था करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे नाव मतदार यादीमध्ये असणे अनिवार्य असते. उमेदवारी अर्ज सादर करताना अशा इच्छुकांना (महिला उमेदवारांसह), त्यांचे मतदार यादीमध्ये जे नाव आहे तेच नाव लिहावे लागेल. उमेदवारी अर्ज सादर केलेल्या विवाहित उमेदवारास, मतदार यादीमध्ये व उमेदवारी अर्जामध्ये नमूद असलेल्या नावाखेरीज मतपत्रिकेवर (ईव्हीएम) इतर नावाचा उल्लेख करण्याची इच्छा असेल तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी तसा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करावा लागेल.

ईव्हीएमवर जागा मात्र तेवढीच
एखाद्या महिलेचे मतदार यादीतील नाव माहेरचे आहे व ती निवडणूक लढणार असेल तर तिच्या माहेरच्या नावासमोर तिचे सासरचे नाव मतपत्रिकेत कंसात छापले जाईल. मात्र, अशी अनुमती देताना ईव्हीएमवर नाव मुद्रित करण्यासाठी जेवढी जागा नेमून दिलेली आहे तेवढ्याच जागेत दोन्ही नावे दिली जातील.

अशी असेल दोन्ही आडनावे देण्याची प्रक्रिया
 इतर नावाचा उल्लेख करण्याच्या अर्जासोबत संबंधित उमेदवारांनी ज्या नावाचा उल्लेख मतपत्रिकेवर करावयाचा आहे. त्या नावासंबंधीचे पुरावे (उदा. विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्रात प्रसिद्ध केलेले विवाहानंतरचे नाव आदी) सादर करणे अनिवार्य असेल. असे प्रमाणपत्र वा राजपत्र उपलब्ध नसल्यास मतदाराने मतदान करण्यापूर्वी आपली ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या ८ नोव्हेंबर २०११ च्या आदेशात नमूद केलेल्या १७ पुराव्यांपैकी, अशा उमेदवाराचे तिला हवे असलेल्या नावासह छायाचित्र असलेला कोणताही एक पुरावा सादर करणे आवश्यक असेल.  निवडणूक निर्णय अधिकारी हे महिला उमेदवाराने सादर केलेले पुरावे लक्षात घेऊन मतपत्रिका तयार करताना दोन्ही नावांचा समावेश करण्याबाबत निर्णय घेतील. त्यानंतर ठरल्यानुसार ईव्हीएमवर नाव मुद्रित करण्यासाठी उपलब्ध जागेवर दोन्ही नावे येतील.

सासर आणि माहेरच्या नावाचा होईल उपयोग
महिलांचे मतदार यादीत असलेले नावच आतापर्यंत ईव्हीएमवर दिले जायचे. एखाद्या महिला उमेदवाराच्या सासरचा स्थानिक राजकारणात दबदबा असला तरी तिचे सासरचे नाव ईव्हीएमवर येऊ शकत नव्हते. एखाद्या महिलेचे सासरचे नाव मतदार म्हणून नोंद असेल आणि तिच्या माहेरचा राजकारणात प्रभाव असेल तरी तिचे माहेरचे नाव ईव्हीएमवर उमेदवार म्हणून येऊ शकत नव्हते. मात्र, आता माहेर आणि सासर अशी दोन्हीकडची नावे घेतली जाणार आहेत.

Web Title: Who are Taisaheb's in-laws and father-in-law? Voters will know on the ballot paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.