५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 09:15 IST2025-11-23T09:14:53+5:302025-11-23T09:15:59+5:30
डॉक्टरांच्या व्हाईट कॉलर मॉड्यूलने अनेक शहरांवर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.

५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
Delhi Blast: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीत 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल' प्रकरणातील मुख्य आरोपी मुजम्मिल गनीने केलेल्या खुलाशांमुळे देशभरात एका मोठ्या घातपाताच्या कटाची माहिती समोर आली आहे. देशातील विविध शहरांमध्ये एकाचवेळी मोठे दहशतवादी हल्ले करण्याच्या उद्देशाने पाच डॉक्टरांनी मिळून तब्बल २६ लाख रुपयांची जुळवाजुळव केली होती, अशी कबुली गनीने दिली. या नेटवर्कने दोन वर्षे स्फोटक सामग्री आणि हल्ल्यांसाठी आवश्यक रिमोट ट्रिगर उपकरणे जमा करण्यात घालवला होता, ज्यावरून ते कट रचत होते हे दिसून आलं आहे.
या कटासाठी गनीने स्वतः ५ लाख रुपये दिले होते, तर आदिल अहमद राथरने ८ लाख, त्याचा भाऊ मुजफ्फर अहमद राथरने ६ लाख आणि शाहीन शाहिदने ५ लाख रुपयांचे योगदान दिले होते. या गटातील डॉ. उमर उन-नबी मोहम्मदने २ लाख रुपये जमा केले होते. महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण २६ लाखांची रक्कम उमरकडे सोपवण्यात आली होती, ज्यावरून हा हल्ला घडवून आणण्याची प्रमुख जबाबदारी त्याच्यावर होती हे स्पष्ट होते.
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गट रातोरात स्फोटके बनवत नव्हता, तर अत्यंत विचारपूर्वक योजना आखत होता. गनीने गुरुग्राम आणि नूह येथून सुमारे ३ लाख रुपये खर्चून २६ क्विंटल एनपीके फर्टिलायझर खरेदी केल्याचे कबूल केले आहे. त्याला खते आणि इतर रसायने गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. उमर उन-नबीच्या देखरेखीखाली या फर्टिलायझरचे स्फोटकांमध्ये रूपांतर केले गेले, तसेच त्यानेच रिमोट डेटोनेटर आणि सर्किटरीची व्यवस्था केली होती. तपासानुसार, अमोनियम नायट्रेट आणि युरिया देखील मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आले होते आणि तांत्रिक गोष्टींसाठी उमरला जबाबदार धरून प्रत्येकाच्या कामाची वाटणी करण्यात आली होती.
आतापर्यंत मुजम्मिल गनी, शाहीन शाहिद आणि आदिल राथर या तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. आदिलचा भाऊ मुजफ्फर राथर, जो नेटवर्कचा भाग असल्याचे संशयित आहे, तो सध्या अफगाणिस्तानमध्ये असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त, अल-फलाह मेडिकल कॉलेजमध्ये उमर, गनी आणि शाहिद यांच्यासोबत काम करणारा निसार उल-हसन याचाही शोध सुरू आहे. लाल किल्ल्याबाहेर १० नोव्हेंबर रोजी ह्युंदाई i20 कारमध्ये ठेवलेले स्फोटके उमरनेच डेटोनेट केले होते, असेही तपासकर्त्यांचे म्हणणे आहे.
एनआयए अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीच्या कबुलीजबाबामुळे अनेक कड्या जोडण्यास मदत झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली आहे, त्यावरून हे सिद्ध होते की हे केवळ एका हल्ल्याचे नाही, तर अनेक शहरांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता. आता तपास यंत्रणेचा मुख्य भर स्फोटकांच्या पुरवठादारांना शोधण्यावर आहे, तसेच या उच्चशिक्षित आरोपींनी आपल्या व्यावसायिक पदवी आणि ओळखीचा गैरवापर केला का, याचाही शोध घेतला जात आहे.