बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 16:01 IST2025-10-05T15:59:56+5:302025-10-05T16:01:20+5:30
निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. आता कोणत्याही मतदान केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदाता नसतील, ज्यामुळे मतदान प्रक्रिया आणि सुरक्षितता सुधारेल.

बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच, बिहार विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 ला संपत असल्याने, त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा असून, निवडणूक आयोगाची टीम गेल्या दोन दिवसांपासून बिहारमध्ये सक्रिय आहे.
या टीमने, पाटणा येथे राजकीय पक्ष, प्रशासकीय अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, विशेष पोलिस नोडल अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन तयारीचा आढावा घेतला. तसेच, बिहारच्या या निवडणुकीत लागू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना भविष्यात देशभरात राबवल्या जातील,असेही यावेळी मुख्य निवडणूक अयुक्तांनी सांगितले.
मतदान केंद्रांवर नव्या सुविधा -
निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. आता कोणत्याही मतदान केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदाता नसतील, ज्यामुळे मतदान प्रक्रिया आणि सुरक्षितता सुधारेल. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) थेट मतदात्यांशी संपर्क साधतील आणि त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. याशिवया, मतदान केंद्रावर मोबाइल जमा करून मतदान करण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे.
100% वेबकास्टिंग, रंगीत छायाचित्र असलेल्या मतपत्रिका -
बिहारमध्ये वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म लागू केला जाईल. आता प्रत्येक उमेदवार आपल्या एजंटला बूथपासून 100 मीटर अंतरावर तैनात करू शकेल. सर्व मतदानकेंद्रांवर 100% वेबकास्टिंग होईल. EVM वर आता काळ्या-पांढऱ्या मतपत्रिकांऐवजी रंगीत छायाचित्र आणि क्रमांक असलेल्या मतपत्रिका असतील, ज्यामुळे उमेदवारांची ओळख सोपी होईल. परिणामी, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी राहील.