Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी(दि.२१) काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. 'मुघल आणि ब्रिटिशांनी देश लुटल्यानंतर जे काही उरले होते, ते या दोन्ही पक्षांनी खिशात घातले,' अशी घणाघाती टीका योगींनी केली. ते एटा येथे एका नवीन सिमेंट प्लांटच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, 'या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. १९४७ ते १९६० पर्यंत भारत जगातील सहावी अर्थव्यवस्था होती. त्यापूर्वी १७ व्या आणि १८ व्या शतकात हा देश जगातील नंबर वन अर्थव्यवस्था होता. आधी आपल्याला प्रथम मुघलांनी लुटले, नंतर ब्रिटिशांनी लुटले. त्यानंतर जे उरले, ते काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने लुटले.'
यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि सपावर 'संकुचित मानसिकता' असल्याचा आणि अराजकतेचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप केला. 'काँग्रेस असो किंवा समाजवादी पक्ष, दोघांचीही मानसिकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास' या दृष्टिकोनाशी जुळत नाही. या संकुचित दृष्टिकोनामुळे हे लोक फक्त त्यांच्या कुटुंबांचा विकास करत राहिले. परिणामी उत्तर प्रदेश आणि देश मागे पडला, गरिबी वाढली, गुंडगिरी वाढली. काँग्रेस आणि सपाच्या राजवटीत ना व्यापारी सुरक्षित होता, ना पोलिस स्टेशन, ना माता भगिनी...' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.