अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 10:51 IST2025-11-21T10:50:02+5:302025-11-21T10:51:20+5:30
युनिव्हर्सिटीचे चेअरमन जवाद अहमद सिद्दीकी यांना नुकतीच अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.

अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
हरयाणाच्या फरीदाबाद स्थित अल-फलाह विद्यापीठाचं भविष्य काय असणार याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. फरीदाबाद, हरियाणा येथील अल-फलाह युनिव्हर्सिटी आणि त्याच्याशी संबंधित अल-फलाह मेडिकल कॉलेजचे भवितव्य आता धोक्यात आले आहे. युनिव्हर्सिटीचे चेअरमन जवाद अहमद सिद्दीकी यांना नुकतीच अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. या कारवाईमुळे संस्थेच्या प्रशासकीय आणि आर्थिक कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निर्णय हरियाणा सरकार घेणार आहे. कारण, ही संस्था 'हरियाणा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ॲक्ट'च्या अंतर्गत येते. मात्र, तपासणीचा केंद्रबिंदू असलेल्या अल-फलाह मेडिकल कॉलेजचे काय होणार, याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारकडून इनपुट्स मिळाल्यानंतर नॅशनल मेडिकल कमिशन घेणार आहे.
विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित?
सध्याच्या गंभीर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल मोठी चिंता निर्माण झाली आहे. मात्र, NMCने निर्दोष विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्यांचे शिक्षण तसेच करिअर पूर्णपणे सुरक्षित राहील,' अशी स्पष्ट ग्वाही NMCने दिली आहे. यासंदर्भात NMC लवकरच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे.
२०२५-२६च्या विद्यार्थ्यांचे काय?
सूत्रांनुसार, अल-फलाह मेडिकल कॉलेजला २०१९ मध्ये मंजुरी मिळाली होती. विशेष म्हणजे, इतर खासगी कॉलेजच्या तुलनेत येथे कमी शुल्क आकारले जात असल्याने गंभीर आरोप असूनही प्रवेशाची मागणी अधिक आहे. याचाच परिणाम म्हणून, २०२५-२०२६ या आगामी शैक्षणिक सत्रासाठी कॉलेजमधील १५० एमबीबीएस जागा भरल्या गेल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून NMC अत्यंत काळजी घेत आहे.
ईडीच्या तपासाचा फास आवळला!
अल-फलाह समूहाचे चेअरमन जवाद अहमद सिद्दीकी यांच्या अटकेनंतर या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे. सिद्दीकी यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट, २००२ च्या कलम १९ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ईडीला मिळालेल्या पुराव्यांच्या सखोल तपासानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून सध्या अल-फलाह ट्रस्ट, संलग्न फर्म्स आणि संस्थेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या लोकांच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली जात आहे.
देशविरोधी कारवायांवर इशारा
आगामी काळात, NMC वैद्यकीय संस्था आणि डॉक्टरांना सामाजिक जबाबदारी पार पाडण्याबरोबरच राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागी होण्यापासून दूर राहण्याचा स्पष्ट सल्ला देणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. अल-फलाह मेडिकल कॉलेजचे भविष्य सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील चौकशीवर पूर्णपणे अवलंबून आहे.