काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 06:19 IST2025-07-29T06:19:38+5:302025-07-29T06:19:38+5:30
तुम्ही या समस्येबद्दल विचार केला आहे का? तुम्ही कोणती पावले उचलली आहेत?

काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आयआयटी खरगपूर आणि ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापीठातील आत्महत्यांच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्न उपस्थित केले. येथे काय गडबड सुरू आहे? विद्यार्थी आत्महत्या का करत आहेत? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे नेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. चौथ्या वर्षाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेवर, खंडपीठाने आयआयटी खरगपूरच्या वकिलाला विचारले की, तुमच्या आयआयटी खरगपूरमध्ये नेमकी काय गडबड सुरू आहे. विद्यार्थी आत्महत्या का करत आहेत? तुम्ही या समस्येबद्दल विचार केला आहे का? तुम्ही कोणती पावले उचलली आहेत?
शारदा विद्यापीठातील एका विद्यार्थिनीशी संबंधित अशीच एक घटना खंडपीठासमोर आली तेव्हा, घटनांचा तपास जलदगतीने पुढे नेऊ द्या असे आदेश न्यायालयाने दिले. वरिष्ठ वकील अपर्णा भट न्यायमित्र म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी दोन्ही प्रकरणांतील तपशील आणि चौकशीची सद्य:स्थिती न्यायालयाला दिली. शारदा विद्यापीठ प्रकरणावरील ३० पानांच्या स्टेटस रिपोर्टचा हवाला देत, भट म्हणाले की एक सुसाईड नोट सापडली असून, दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
पालकांना माहिती देणे हे तुमचे कर्तव्य नव्हते का?
खंडपीठाने विद्यापीठात घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल कठोर भूमिका घेतली आणि वकिलाला विचारले, तुम्ही आमच्या निर्देशांचे पालन का करत नाही? आम्ही यापूर्वीच सविस्तर निर्णय दिला आहे. हे आपण आपल्या मुलांसाठी करतो... पोलिसांना आणि पालकांना लगेच माहिती देणं हे तुमचं कर्तव्य नव्हतं का? आयआयटी खरगपूरच्या वकिलांनी सांगितले की १० सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे आणि १२ सदस्यांचे समुपदेशन केंद्रदेखील स्थापन करण्यात आले आहे.
कोणीतरी एफआयआर दाखल केला, पण कुणी?
कोर्टाने विचारले की शारदा विद्यापीठ प्रकरणात कोणतीही एफआयआर दाखल झाली आहे का, तेव्हा भट यांनी होकारार्थी उत्तर दिलं. यावर न्यायालयाने विचारलं, कोणीतरी एफआयआर दाखल केला, पण नेमका कुणी? भट यांनी सांगितलं की मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी एफआयआर दाखल केला, तेव्हा न्यायालयाने प्रश्न केला, वडिलांना हे कसं कळलं की त्यांची मुलगी मरण पावली आहे? त्यांना कोणी कळवले?