राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:27 IST2025-11-06T18:27:03+5:302025-11-06T18:27:31+5:30
त्यांनी, पलवलमधील भाजप नेत्याच्या घराचा उल्लेख करत, त्यांच्या घराच्या पत्त्यावर तब्बल ६६ मतदारांची नोंद असल्याचे सांगितले होते. मात्र आता या प्रकरणात वेगळेच सत्य समोर आले आहे.

राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
हरियाणा विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यात सुमारे २५ लाख बनावट मतदार असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी, पलवलमधील भाजप नेत्याच्या घराचा उल्लेख करत, त्यांच्या घराच्या पत्त्यावर तब्बल ६६ मतदारांची नोंद असल्याचे सांगितले होते. मात्र आता या प्रकरणात वेगळेच सत्य समोर आले आहे.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, राहुल गांधींनी उल्लेख केलेले घर पलवल जिल्ह्यातील होडल विधानसभा मतदारसंघातील गुदराना गावात आहे. हे घर सुमारे एक एकर परिसरात बांधण्यात आले आहे. त्यात राहणारे उमेश हे भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत. उमेश यांनी म्हटले, आपल्या विस्तारित कुटुंबात सुमारे १५० मतदार आहेत. आजोबांचे चार भाऊ होते. यानंतर वडलांचे 9 भाऊ झाले. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबात 200 सदस्य आहेत. यामुळे सर्वांची मतदार नोंद एकाच पत्त्यावर असणे स्वाभाविक आहे.
दुसरीकडे गुदरानाच्या बीएलओने म्हटले आहे की, नव्या मतदार नोंदीत जुन्या घराचा क्रमांक चुकून वापरला गेला आहे. राहुल गांधींनी ज्या दुसऱ्या घराचा होडलमधील घर क्रमांक २६५ चा उल्लेख केला होता, त्यात ५०१ मतदार असल्याचा दावा केला होता. मात्र तो क्रमांकच सापडला नाही.
काय म्हणाले होते राहुल गांधी ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हरियाणातील निवडणुकीसंदर्भात गंभीर आरोप केले होते. त्यांनी दावा केला होता की, राज्यातील प्रत्येक आठवे मत बनावट आहे आणि तब्बल २५ लाख मतदार बनावट आहेत. राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, १,२४,१७७ मतदारांची छायाचित्रे एकसारखी असून तीच छायाचित्रे अनेक वेळा वापरण्यात आली आहेत. एवढेच नाही तर, या गैरव्यवहाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी CCTV फूटेजदेखील नष्ट करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला होता.