जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 06:23 IST2025-10-03T06:23:27+5:302025-10-03T06:23:46+5:30
केंद्र सरकारची समिती घेणार अभ्यासक्रमांचा आढावा

जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी महत्त्वाच्या असलेल्या जेईई आणि नीट या सारख्या प्रवेशपरीक्षांची व इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमाची काठिन्य पातळी परस्परांशी सुसंगत आहे का याचे मूल्यमापन करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. विद्यार्थ्यांना खासगी कोचिंग संस्थांवर अवलंबून राहावे लागू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोचिंग संस्थांचा बडेजाव कमी करण्यासाठी उपाययोजना
कोचिंगशी संबंधित मुद्द्यांची तपासणी करण्यासाठी जून महिन्यात केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अभिप्रायानुसार हा आढावा घेतला जाईल. दोन्ही घटकांच्या काठिन्य पातळीत विसंगती आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसवर अवलंबून राहावे लागते असे काही पालक व कोचिंग क्लासचे प्राध्यापक यांचे मत आहे. ‘डमी शाळा’ या संकल्पनेचा उदय, प्रवेश परीक्षांची उपयोगिता वाढविण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, कोचिंग संस्थांवर विद्यार्थ्यांनी अवलंबून राहू नये यासाठी काय करावे याचा ही समिती विचार करणार आहे.
कोचिंग क्लासेसमुळे अनेक समस्या
केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी अध्यक्ष असलेल्या या समितीत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) अध्यक्ष, शालेय आणि उच्च शिक्षण विभागातील सहसचिव, आयआयटी मद्रास, एनआयटी त्रिची, आयआयटी कानपूर आणि नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे (एनसीइआरटी) प्रतिनिधी, तसेच केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि एका खासगी शाळेचे प्राचार्य यांचा समावेश आहे.
कोचिंग क्लासेसमुळे गेल्या काही वर्षांत अनेक वाद निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रकार, कोचिंग सेंटरमधील आगीच्या घटना, सुविधांची कमतरता आणि तेथील अध्यापन पद्धती या बाबींवर सरकारकडे तक्रारी आल्यानंतर केंद्राने त्याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.
करिअर मार्गदर्शन सेवांची उपलब्धता : शाळा-महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन सेवांची उपलब्धता व कार्यक्षमता यांचेही मूल्यमापन होणे गरजेचे आहे. करिअर मार्गदर्शन प्रणाली बळकट करण्यासाठी उपाय सुचवायला हवेत. या सर्व गोष्टींचा ही समिती अभ्यास करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.