'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:21 IST2025-09-25T15:18:19+5:302025-09-25T15:21:58+5:30
लडाखसाठी आजचा लढा संपूर्ण देशाचा उद्याचा लढा बनू शकतो. जेव्हा सरकार लोकशाहीचा आवाज दाबते तेव्हा लोकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपला आवाज आणखी वाढवावा, असं विधान केजरीवाल यांनी केले.

'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
मागील काही दिवसापासून लड्डाखमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने काल हिंसक वळण घेतले. दरम्यान, यावर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली. 'लडाखमधील आजचा लढा उद्या देशव्यापी लढाईत बदलू शकतो. जेव्हा सरकार लोकशाहीचा आवाज दाबते तेव्हा जनतेचे कर्तव्य आहे की त्यांनी आवाज उठवावा', असं विधान त्यांनी केले.
काल लड्डाखमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतले. यामध्ये मोठी जाळपोळ झाली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. लडाखमधील आंदोलनावर अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. "आज लडाखमध्ये जे घडत आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. प्रत्येक खऱ्या देशभक्ताने लडाखच्या लोकांना पाठिंबा दिला पाहिजे. आपण ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवले होते का जेणेकरून लोक ब्रिटिशांऐवजी भाजपचे गुलाम बनतील? भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद सारख्या क्रांतिकारकांनी लोकशाहीसाठी आपले प्राण दिले जेणेकरून प्रत्येक भारतीयाला स्वतःचे सरकार निवडण्याचा अधिकार मिळेल', असे पोस्टमध्ये केजरीवाल यांनी म्हटले आहे.
सत्तेच्या नशेत असलेला भाजप एकामागून एक राज्य केंद्रशासित प्रदेशात रूपांतरित करत आहे, संविधानाने दिलेले अधिकार हिरावून घेत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, "लडाखचे लोक काय मागत आहेत? ते फक्त त्यांचा मतदानाचा अधिकार, सरकार निवडण्याचा अधिकार मागत आहेत. पण भाजप त्यांचा आवाज दाबत आहे. वारंवार आश्वासने देऊनही, ते त्यांना मतदानाचा अधिकार देत नाही."
'आता मौन बाळगणे शक्य नाही आणि ही लढाई देशव्यापी होऊ शकते. लोकशाही हा लोकांचा आवाज आहे आणि जेव्हा सरकार तो आवाज दाबू लागते, तेव्हा लोकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आणखी मोठ्याने बोलावे. जर आपल्याला देशाची लोकशाही वाचवायची असेल, तर आपण या हुकूमशाहीविरुद्ध गप्प राहू शकत नाही. आज, लडाखचा लढा उद्या संपूर्ण देशाचा लढा बनू शकतो", असंही या पोस्टमध्ये केजरीवाल यांनी म्हटले आहे.
लडाखमध्ये काय घडले आहे?
लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा विस्तार करण्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. लेह एपेक्स बॉडी नेतृत्त्वाखालील आंदोलनाला हिंसक वळण लागले जेव्हा निदर्शकांनी भाजप कार्यालय आणि अनेक वाहनांना आग लावली आणि शेकडो लोक रस्त्यावर उतरले. लडाखची राजधानी पूर्ण बंद असताना ज्वाला आणि काळा धूर दिसत होता. लेहमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. प्रशासनाने लडाखच्या लेह जिल्ह्यात भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले.
आज लद्दाख में जो हो रहा है, वो बेहद चिंताजनक है। हर सच्चे देशभक्त को लद्दाख के लोगों का साथ देना चाहिए।
हमने अंग्रेज़ों से इसलिए आज़ादी थोड़ी ली थी कि जनता अंग्रेज़ों की बजाय बीजेपी की गुलाम बन जाए?
भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद जैसे क्रांतिकारियों ने लोकतंत्र के लिए अपना बलिदान…— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 25, 2025