"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:36 IST2026-04-08T17:34:06+5:302026-04-08T17:36:25+5:30
ओवैसी म्हणाले, "जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने (पाकिस्तान) केले. इराण भारताच्या अधिक जवळ आहे, तरीही भारत मध्यस्थीची भूमिका का बजावू शकला नाही, याचे दुःख वाटते."

"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला आहे. यानंतर, भारतात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी यासंदर्भात मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. ओवैसी म्हणाले, "जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने (पाकिस्तान) केले. इराण भारताच्या अधिक जवळ आहे, तरीही भारत मध्यस्थीची भूमिका का बजावू शकला नाही, याचे दुःख वाटते." भाजप केवळ '३ तासांचा चित्रपट' दाखवून जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
काश्मीरमधील नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
इराण आणि अमेरिका यांच्यात ४० दिवसांच्या संघर्षानंतर झालेल्या या सीजफायरवर जम्मू-काश्मीरमधील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली. नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनी या कराराचे स्वागत केले. अब्दुल्ला श्रीनगरमध्ये म्हटले, "युद्धाने काहीही साध्य होत नाही, चर्चा हाच एकमेव मार्ग आहे. दोन्ही देश चर्चेच्या टेबलावर आले, याबद्दल मी देवाचे आभार मानतो."
काय म्हणाले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला?
दुसरीकडे, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मात्र या युद्धाच्या फलनिष्पत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी #UnjustWar असे लिहीत 'X' वर पोस्ट करताना म्हटले की, "या करारामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' पुन्हा खुला झाला. जो युद्धापूर्वीही सर्वांसाठी खुलाच होता. ४० दिवसांच्या युद्धानंतर अमेरिकेला नेमके काय साध्य झाले?" ओमर अब्दुल्ला यांनी असे म्हणत अमेरिकेच्या धोरणात्मक अपयशावर बोट ठेवले आहे.