"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:32 IST2025-09-16T16:30:18+5:302025-09-16T16:32:17+5:30
बीएमडब्ल्यू कार चालवणारी आरोपी गगनप्रीत कौर सध्या न्यायालयीन कोठडीत असून, तिने जामिनासाठी अर्ज केला आहे.

"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
दिल्लीतील धौला कुंआ येथे झालेल्या भीषण कार अपघाताने एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. या घटनेत नवजोत सिंह यांचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे. दुसरीकडे, बीएमडब्ल्यू कार चालवणारी आरोपी गगनप्रीत कौर सध्या न्यायालयीन कोठडीत असून, तिने जामिनासाठी अर्ज केला आहे. तिने हा अपघात अचानक आणि चुकून झाल्याचे म्हणत जामिनासाठी अर्ज केला आहे.
गगनप्रीत कौरच्या वकिलांनी म्हटले की, त्या दोन लहान मुलींची आई आहेत, त्यांचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही आणि या अपघातात त्यांनाही डोक्याला मार लागला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३च्या कलम ४८० अंतर्गत दाखल केलेल्या जामीन अर्जात, वकिलांनी म्हटले आहे की, कौर यांनी तपासात पूर्ण सहकार्य केले आहे आणि त्यांना पोलीस कोठडीची गरज नाही. तसेच, त्या पळून जाण्याची किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता नाही, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
सोमवारी, कर्तव्यदंडाधिकारी आकांक्षा सिंह यांनी कौर यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाने त्यांच्या जामीन अर्जावर नोटीस जारी केली असून, सुनावणी १७ सप्टेंबरला होणार आहे. यासोबतच, कोर्टाने तुरुंग प्रशासनाला योग्य वैद्यकीय सुविधा पुरवण्याचेही निर्देश दिले आहेत.
गगनप्रीत कौरच्या वतीने ज्येष्ठ वकील विकास पाहवा आणि अधिवक्ता प्रभाव रल्ली यांनी पोलिसांच्या रिमांड अर्जाला विरोध केला. गुन्हा दाखल करण्यास १० तासांचा विलंब झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, पीडितांच्या वतीने अधिवक्ता इशान दिवाण बाजू मांडत आहेत. पोलिसांनी इतर कलमांसोबतच सदोष मनुष्यवधाशी संबंधित कलम देखील लावले आहे.
अभियोजन पक्षाच्या दाव्यानुसार, गगनप्रीतची बीएमडब्ल्यू कार दुभाजकाला धडकून उलटली, ज्यामुळे नवजोत सिंह यांची दुचाकी एका डीटीसी बसला धडकली. या अपघातात कौर, त्यांचे कुटुंबीय आणि नवजोत सिंह यांची पत्नी जखमी झाले होते. १५ सप्टेंबर रोजी गगनप्रीत कौर यांना रुग्णालयातून अटक करण्यात आली होती. १७ सप्टेंबर रोजी जामीन अर्जावर निर्णय होईपर्यंत त्या न्यायालयीन कोठडीतच राहणार आहेत.